मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पूर्ण ताकदीने शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील मतदारसंघांकडे यावेळी विशेष लक्ष असणार आहे. कारण मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांमुळे हा भाग चांगलाच ढवळून निघालेला आहे. याच मराठवाड्यात पाथरी हा मतदारसंघ आहे. या जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे नेते प्रयत्न करत आहेत. 


सुरेश वरपूडकर यांचा विजय


पाथरी विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी विशेष आहे. गेल्या चार निवडणुकांत या मतदारसंघाने प्रत्येक वेळी नव्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे. म्हणजेच गेल्या चार निवडणुकांत एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून आलेला नाही. 2019 च्या निवडणुकीत इथे तत्कालीन अपक्ष आमदार मोहन फड यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपुडकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनी 1 लाख 5 हजार 625 मतं घेतली होती. तर मोहन फड यांना 90 हजार 851 मते मिळाली होती. म्हणजेच मोहन फड यांना 14774 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत वंचितच्या विलास बाबर यांनी 21702 मतं घेतली होती. चौथ्या क्रमांकावर  अपक्ष उमेदवार डॉ. जगदीश शिंदे होते. त्यांना एकूण 8520 मते मिळाली होती.  


अनेक नेते उमेदवारीच्या शर्यतीत


यावेळच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तयार झालेल्या महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्षाकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीही शड्डू ठोकला आहे. बाबाजानी मलाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत मतदारसंघात प्रचाराला लागले आहेत. तिकडे महायुतीत यावेळी माजी आमदार मोहन फड हे अचानक आजारी पडल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांच्या आजारीपणामुळे इथे भाजप बॅकफुटवर गेली आहे. मात्र असे असले तरी अनेक जण भाजकडूनही इच्छुक आहेत. 


राजेश विटेकर यांच्या मातोश्री यांना तिकीट मिळणार? 


दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनीही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यांनीदेखील जोरदार तयारी केली आहे.  एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे आणि ही जागा आम्ही निवडून आणणार असे ते प्रचार करताना बोलताना दिसतायत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नुकतेच विधानपरिषदेवर गेलेले राजेश विटेकर यांनाही पक्षाकडून निवडणूक लढवण्याबाबत सूचना मिळाल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांना उभं करण्याबाबत  निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या दाव्यावर आता महायुतीचे नेते काय निर्णय घेतात आणि कोण निवडणूक लढवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा :


Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?