मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री निवासस्थानी गुरुवारी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक बोलावली होती.  मात्र या बैठकीला विधानसभेतील पक्षाचे गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary) आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर (Prakash Phaterpekar) यांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोघांचा पत्ता कट होणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. 


चेंबूरमधून अनिल पाटणकर इच्छुक


या बैठकीला चौधरी आणि फातर्पेकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे हे दोन आमदार अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे. या दोन मतदारसंघांत विद्यमान आमदारांव्यतिरिक्त प्रबळ दावेदार असल्यामुळे या मतदारसंघाचा तिढा आता खुद्द उद्धव ठाकरे सोडवणार असल्याची माहिती मिळत आहे. चेंबूरमध्ये विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर असले तरी माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 


शिवडीतून सुधीर साळवी प्रबळ दावेदार


तर शिवडी मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी हे आतापर्यंत दोनदा निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना विधानसभेच्या गटनेतेपदी नेमले होते. मात्र गटनेते पदावरून चौधरी यांची आक्रमकता दिसली नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीत शिवडीमध्ये मताधिक्य घटल्यामुळे चौधरी यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी आहे का? याबाबतही चाचपणी केली जात आहे. तर सुधीर साळवी हे यंदा शिवडीतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे आता या दोन आमदारांचा पत्ता कट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


काय म्हणाले संजय राऊत? 


दरम्यान, शिवसेनेच्या मुंबईतल्या विद्यमान आमदारांना डच्चू मिळेल अशी चर्चा आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला असं वाटत नाही. उद्धव ठाकरे हे कालपासून कामाला लागलेले आहेत. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांना बैठकीच्या आमंत्रण नव्हते. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, एकाच दिवशी सगळ्यांना आमंत्रण दिले जात नाही. अजय चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते शिवसेनेचे विधानसभेचे  गटनेते आहेत. त्यांच्या विषयाच्या अशा अफवा कोणी पसरत असेल तर ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...