नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. दररोज नवनवीन उमेदवारांची नावे समोर येत असून आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. 


बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये (Nashik) मोठी घोषणा केली. संजय पांडे हे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. संजय यांनी स्वतः चार उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. 


संजय पांडेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू 


संजय पांडे म्हणाले की, आम्ही एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. मी स्वतः वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघातून शामराव भोसले निवडणूक लढवणार आहे. त्यांना आमचा पाठींबा आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आणखी दोन उमेदवारांची घोषणा देखील त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माझी समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचणी सुरु असून त्याबद्दल देखील लवकरच घोषणा करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. 


संजय पांडेंची पोस्ट आली होती चर्चेत


दरम्यान, संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटले होते. आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशी पोस्ट संजय पांडे यांनी केली होती. संजय पांडे यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यानंतर संजय पांडे यांनी थेट चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sharad Pawar on PM Modi : वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका


Zeeshan Siddique : काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटण्याच्या तयारीत? थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावल्याने चर्चा रंगली