रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष, नेते, स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. आपल्या मतदारसंघात आपली ताकद किती? विरोधकांच्या कमी - अधिक गोष्टी जाणून घेऊन त्यावर उपाय देखील शोधले जात आहे. पक्ष प्रवेश असेल किंवा केलेल्या विकासकामांच्या मदतीनं आत्तापासूनच मतांची जुळवणी आणि मतदारांशी संवाद साधला जात आहे. त्याचवेळी आजी, माजी आमदार देखील सक्रीय झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आता उमेदवारी मिळवण्यासाठी वेगगेवळ्या रणनीती आखल्या जात आहेत. शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले सुभाष बने आपल्या मुलाला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी थेट 'मातोश्री'वर फिल्डींग लावली आहे. सुभाष बने यांचा मुलगा रोहन बने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय, चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा क्षेत्रात त्यांचा वावर, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कदेखील चांगला आहे. त्याच जोरावर आणि माजी आमदार म्हणून असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर सुभाष बने सध्या सक्रीय झालेले आहे. रोहन बने यांना तिकीट मिळावे यासाठी त्यांच्याकडून सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सध्या अजित पवार यांच्यासोबत असलेले शेखर निकम हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. 


राष्ट्रवादीची जागा शिवसेनेला सोडणार? 


चिपळूण - संगमेश्वर ही विधानसभेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. अजित पवार गटासोबत गेलेले शेखर निकम या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्यामध्ये सद्यस्थिती पाहता जागा इतर पक्षाला किंवा उमेदवाराला देणार का? असा प्रश्न आहे. मुख्य बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांचा पराभव झाला. पण, चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना मताधिक्य होतं. त्याचाच वापर करून माजी आमदार सुभाष बने यांच्याकडून रोहन बने यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच रोहन बने यांचा असलेला संपर्क, त्यांची सक्रियता आणि पक्षासाठी केलेलं काम याचादेखील दाखला सध्या दिला जात आहे. 


कोण आहेत रोहन बने? 


रोहन बने हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. उच्च विद्याविभूषित म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तरूण नेतृत्व, कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. चिपळूणला आलेला पूर, तोक्ते किंवा निसर्ग चक्रीवादळ या काळात रोहन बने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागांत आपल्या कार्यकर्त्यांसोबत फिरून लोकांना मदतीचा हात पुढे केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना शाळा, कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात लावले जाणारे आय़टम सॉग बंद करण्याचा निर्णय रोहन बनेंनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची चर्चा झाली होती. शिवाय, शांत आणि संयमी असल्यामुळे विधानसभेसाठी मतदारसंघाचा विचार करता रोहन बनेंचा चेहरा पक्षाला लाभदायी ठरेल असा अंदाज आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन चेहरे


चिपळूण- संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातील आमदार शेखर निकम हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे शरद पवार यांनी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार केल्याचं बोललं जात आहे. जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील असा अंदाज सध्या बांधला जात आहे. दरम्यान, निकम यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्याजागी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चिपळूणमधील वाशिष्टी डेअरीचे ते चेअरमन आहेत. शिवाय, सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा म्हणूनदेखील त्यांच्याकडं पाहिलं जातं. 


महाविकास आघाडी, महायुतीत रस्सीखेच!


चिपळूण - संगमेश्वर या जागेसाठी केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीतही रस्सीखेच, दावे - प्रतिदावे केले जात आहेत. एकसंध शिवसेनेचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे विद्यमान नेते सदानंद कदम यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्तीप्रदर्शन करत सदरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळावी अशी मागणी केली आहे. त्याचवेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील या जागेवर दावा केला आहे.


हेही वाचा: 


Ratnagiri Vidhansabha Constituency: उदय सामंतांना हरवणारा उमेदवार शोधण्यासाठी मिलिंद नार्वेकर सक्रिय, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात हालचालींना वेग