भंडारा : विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Election 2024) पडघम आता वाजू लागलेलं आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्यात. मात्र, जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर दावा सांगून या जागा खेचून आणण्यासाठी पटोले यांनी शड्डू ठेकला आहे.
जागा वाटपाच्या पूर्वीचं नाना पटोले यांनी दावा सांगून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कोंडीत पकडले आहे. शिवसेना उबाठाने भंडारा तर, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केलेला आहे. नाना पटोले दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडायला तयार नसल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दिसणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यातच आगामी काळात महाविकास आघाडीचं काम करून उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या भंडाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
नाना पटोले मित्र पक्षांना जागा सोडायला तयार नाही
शरद पवार यांनी खुद्द नाना पटोले हे जागा सोडायला तयार नसल्याचं वक्तव्य केले अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, चरण वाघमारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे यांची त्यांनी भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकं आमच्या भेटीला येतात, आपलं प्रोफाईल दाखवतात, त्यांनी केलेल्या कामाचं पुस्तिका दाखवितात. भंडाऱ्यासाठी बाहेरचा कुणीही आमच्या संपर्कात नाही आणि निष्ठावंतांना डावलणार नसल्याचा शब्द शरद पवारांनी दिलाय, असे त्यांनी सांगितले.
आम्ही आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे काम करू
अद्याप जागा वाटप जाहीर झालेले नाही. नाना पटोले यांनी सातही जागा मागितल्यानं पक्षाला एकही जागा मिळते की नाही, हे शरद पवारांनी सांगितलं आहे. चरण वाघमारे हे खूप अनुभवी आहेत त्यांनी आतापर्यंत 13 पक्ष बदलविलेत. त्यांच्या एवढा महाराष्ट्रात दुसरा कोणीही अनुभवी नाही. त्यांनी प्रहारची पण तिकीट मागितलेली आहे. अगोदर त्यांनी आमच्या पक्षाची पन्नास रुपयाची पावती फाडावी. त्यानंतर पक्षाच्या तिकीटाची मागणी करावी. जर महाविकास आघाडीत काँग्रेसला भंडारा जिल्ह्यातील तिन्ही जागा गेल्या, तर आम्ही आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे काम करू आणि जागा जिंकून आणू, असेही किरण अतकरी यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा