Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच राजकीय नेत्यांनी देखील गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) आणि वैभव पिचड (Vaibhav Pichad) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज अकोले (Akole) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.


शरद पवारांच्या मेळाव्याला पिचड उपस्थित राहणार?


दरम्यान, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी याआधी देखील तीन वेळा भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली होती, अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे दोघेही  हजेरी लावण्याची शक्यता आहे. 


2019 ला मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश


मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी सन 2019  मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे हे विजयी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी स्वतंत्र चूल मांडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले आहेत.  


अकोले विधानसभेचे तिकीट कोणाला मिळणार?


मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आहे. 2019 साली राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता. आज किरण लहामटे महायुतीसोबत असल्यामुळं अकोले विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेत पिचड कुटुंबीयांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलणार आहेत. पिचड यांनी जर पक्षप्रवेश केला तर हा भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे.


अकोलेत फ्लेक्सबाजी, गद्दारांचा नव्हे तर निष्ठावांतांचा तालुका 


शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका दौऱ्यावर येत आहेत. मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर किरण लहामटे यांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार अकोलेत येत असल्याने त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील मुख्य असलेल्या महात्मा फुले चौकात त्यांचं आगमन होणार आहे. या चौकात लागलेल्या फ्लेक्सन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मधुकर पिचड यांचा प्रवेश होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी लागलेले फ्लेक्स हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गद्दारांचा नव्हे तर निष्ठावांतांचा तालुका अशा आशयाचे फ्लेक्सबाजी केल्यानं भांगरे समर्थकांनी गद्दारांना स्थान देऊ नये, असा संदेश यातून व्यक्त केला आहे. 


महत्वाच्या बातम्या: 


मधुकर पिचडांना धक्का बसणार, पिचडांचे खंदे समर्थक सीताराम गायकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार