सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi)आज महाराष्ट्रात तीन सभा होत आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींनी सभांचा धडाका लावला असून आज भाजपा आणि महायुतीचे माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ मोदींनी माळशिरस येथे सभा घेतली. मोदींच्या सभेसाठी मोठी गर्दी जमा झाली होती, तर नेहमीचप्रमाणे मोदींनी आपल्या सभेतून काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. त्यानंतर, माढ्यातील पाणीप्रश्न व ऊस दराच्या स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करत स्थानिक मतदारांना साद घातली आहे. मोदींच्या सभेनंतर उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जीजामाला नाईक निंबाळकरांनी संवाद साधताना, आता गुलाल आमचाच आहे, हे आजच्या गर्दीने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली. 


सोलापूर-धुळे महामार्गावरील पळसवाडी पाटी शेजारील मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आले होते. या भाषणामध्ये माढ्याचा पाणी प्रश्न, ऊसाच्या दरावरुन मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधला. काँग्रेसने 60 वर्षात जे केले नाही ते आम्ही दहा वर्षात केले, राम मंदिराच्या प्रश्नावरुनही काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींच्या सभेनंतर निंबाळकर कुटुंबीयांचा उत्साह वाढला असून रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या पत्नीने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. 


सभा अतिशय छान झाली,सर्वांची भाषणं उत्तम झाली. सभेची गर्दी पाहून लक्षात येईल की रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठिशी व पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी लोकं भक्कमपणे उभे आहेत. एवढ्या उन्हाताणाची तुफान गर्दी सभेला होती. रणजीतसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार होणार आहेतच, केवळ कुठल्या तालुक्याचा किती वाटा आहे, हेच पाहायचे आहे, अशा शब्दात जीजामाला नाईक निंबाळकर यांनी मोदींच्या सभेनंतर विजयाचा विश्वास बोलून दाखवलाय. माण-खटाव-फलटण तालुक्यात चांगली परिस्थिती आहे, आम्ही गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत. त्यामुळे,4 जून रोजी रणजीतसिंहांचा गुलाल असणार आहे, भाजपाच गुलाल असणार आहे, अर्थात नरेंद्र मोदींसाठीच असणार आहे, असेही जीजामाला यांनी म्हटलं. तसेच, मोदींची सभा खाली बसून बघण्यात वेगळीच मजा आहे. त्यामुळे,आम्ही खाली प्रेक्षकांमध्ये बसून मोदींची सभा ऐकल्याचंही त्यांनी सांगितले. 


रणजीतसिहांच्या सख्ख्या आत्या विरोधात


खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सख्या आत्या उज्वला शिंदेनी फलटणमध्ये धैयशील मोहिते पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं होम पीच असलेल्या फलटण मधील मलठण भागात पदयात्रा केली. उज्वला शिंदे यांच्या सोबत रामराजें यांचे चिरंजीव अनिकेत राजे आणि रामराजे गटाचे माजी नगरसेवकांनी पदयात्रेत सक्रीय सहभाग घेतला. रामराजे आणि संजीव नाईक निंबाळकर वगळता त्यांचे सर्व कुटूंबीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत.


हेही वाचा


PM Modi: मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आलीय, मोदींचा माढ्यात शरद पवारांवर हल्लाबोल