Eknath Khadse जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा (NCP Sharad Pawar Faction) आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र अजूनही त्यांचा पक्षप्रवेश अजूनही रखडला आहे. मात्र एकनाथ खडसे हे त्यांची सुनबाई रावेर लोकसभा मतदारसंघाच्या (Raver Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

  


राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांशी बैठका घेतल्याचं समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये जाणार असल्याच्या अनेक दिवस पासून चर्चा सुरू होत्या. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. 


रक्षा खडसेंच्या विजयासाठी एकनाथ खडसे मैदानात 


अद्याप त्यांचा प्रवेश झाला नसला तरी एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात सावदा आणि फैजपूर परिसरात बैठका घेतल्या. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. 


आता कोणाचाही प्रचार करू शकतो - एकनाथ खडसे 


थेट रक्षा खडसे यांच्या प्रचारात सहभागी न होता आपल्या समर्थकांसोबत त्यांनी सावदा आणि फैजपूर भागात या बैठका घेतल्या. या मेळाव्यात त्यांनी रक्षा खडसे यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचा आपण राजीनामा दिला असल्याने आता आपण कोणाचाही प्रचार करू शकतो, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तसेच आमदारकीच्या राजीनाम्याबद्दल एकनाथ खडसे यांनी जेव्हा शरद पवार मला आमदारकीचा राजीनामा मागतील तेव्हाच मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे सांगितले. आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची ताकद वाढणार असल्याचे दिसून येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन


Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट