Exclusive MLA Babandada Shinde : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच मतदारसंघातमध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच सध्या माढा विधानसभा मतदारसंघाची (Madha Vidhansabha Election) राज्यभर चर्चा होत आहे. माढा मतदारंसघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. मात्र, मागील दोन दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे यावेळी माढा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. याबाबत आमदार बबनदादा शिंदे यांनी एबीपी माझाला सविस्तर माहिती दिली आहे.


 शरद पवार यांनी तिकीट दिले तर तुतारीकडून निवडणूक लढवणार


आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवारांची नेमकी भेट का घेतली? आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? रणजित शिंदे तुतारीकडून विधानसभेची निवडणूक लढवणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याबाबत खुद्द आमदार बबनदादा शिंदे यांनी माहिती दिली आहे. मी लोकांच्या आग्रहास्तव शरद  पवार यांची भेट घेतली आहे. आम्ही गेल्या 38 वर्षापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केल्याची माहिती आमदार शिंदे यांनी एबीपी माझाला दिली. माढा विधानसभेसंदर्भात शरद पवार यांनी काही आश्वासन दिले आहे का? असा प्रश्न विचारला असता आमदार शिंदे म्हणाले की, तसे मला कोणतेही आश्वासन मिळाले नाही. पण शरद पवार यांनी आम्हाला तिकीट दिले तर तुतारी चिन्हावर रणजित शिंदे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. 


महायुतीकडून लढणार की नाही? कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवू


महायुतीकडून निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेणार असल्याची माहीती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. ते सध्या अजित पवार गटात आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर आमदार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, आम्हाला जर शरद पवार यांच्याकडून तिकीट मिळाले नाहीतर, आम्ही अपक्ष देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे म्हणाले. एकतर शरद पवार गटाकडून निवडणूक लढावी नाहीतर अपक्ष निवडणूक लढावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची देखील तशी इच्छा असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. 


रणजित शिंदे यांना एक संधी द्यावी


माझे वय झाले आहे. प्रकृतीच्या कारणामुळं मी यावेळेस विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळं रणजित शिंदे हेच माढा विधानसभेची निवडक लढवणार आहेत. त्यांना एकवेळ जनतेनं संधी द्यावी, असं आवाहन आमदार शिंदे यांनी केलं आहे. एकदा संधी द्यावी, ते काम करतात की नाही हे जनतेनं पाच वर्ष पाहावं त्यानंतर पुढच्या वेळेस निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाल असल्याचे आमदार शिंदे म्हणाले. 


विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे देखील विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ते देखील तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत आमदार शिंदे यांना जास्त बोलण्यास नकार दिला. आम्ही देखील ऊसाला चांगला दर दिला असल्याचे आमदार शिंदे म्हणाले. 


धनराज शिंदे यांच्याबाबत बोलण्यास नकार


दरम्यान, माढा विधानसभेसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील तयारी करत आहेत. तिकीट मिळाले तर शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी विचारले असता, ते म्हणाले की, मला त्यांच्याबाबत काहीही माहिती नाही, असे म्हणत धनराज शिंदेबाबात वक्तव्य करण्यास आमदार शिंदे यांनी नकार दिला. आम्ही मात्र, शरद पवार यांचे तिकीट मिळाले तर पवार गटाकडून नाहीतर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे शिंदे म्हणाले. 


आम्हाला विजयाची खात्री


गेल्या अनेक वर्षापासून अनेकजण माझ्याविरोधात एकत्र येतात. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आमदार शिंदे म्हणाले. कितीही विरोधक एकत्र आले तरी आम्हाला विजयाची खात्री असल्याचे शिंदे म्हणाले. माढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणारे सर्व उमेदवार आमदार शिंदे यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. ज्याला शरद पवार गटाचे तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार तिकीट नेमकं कोणाला देणार हा सध्या महत्वाचा प्रश्न आहे. जर रणजित शिंदे यांना तिकीट दिले तर विरोधक आमदार शिंदे यांच्या पाठिशी उभे राहणार का? हा देखील चर्चेचा विषय आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Madha Vidhansabha : माढ्यातून शरद पवारांच्या मनात नेमकं कोण? इच्छुकांच्या गर्दीनं राजकीय मैदान तापलं, तुतारी मिळवण्यासाठी धडपड