मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगानं मान्यता दिल्याची काल माहिती दिली होती. राजकीय पक्षाला मान्यता मिळताच संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोहीम जाहीर केली आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाचं  जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ते शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप आणि शिवसेनेला प्रश्न विचारले आहेत.


संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?


मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. 24 डिसेंबर 2016 रोजी भाजप - शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत.  येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही.चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. 


संभाजीराचे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे 6 ऑक्टोबरला 11 वाजता जमणार आहेत. 


संभाजीराजे छत्रपती यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सध्या परिवर्तन महाशक्ती आघाडीचा सदस्य आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी चला शिवस्मारक शोधायला ही मोहीम जाहीर करत भाजप आणि शिवसेनेला हेच का अच्छे दिन असं म्हणत प्रश्न विचारला आहे.


महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे चिन्ह


संभाजीराजे छत्रपती यांनी 9 ऑगस्ट 2022 ला “स्वराज्य संघटना” स्थापन केली होती. आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.






इतर बातम्या :


नागपूर शहरातील सर्वात उंच इमारत वादाच्या भोवऱ्यात, भाजप नेत्याच्या कुकरेजा इमारतीला संरक्षण विभागाचा विरोध


रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा