सोलापूर : माढा लोकसभेच्या उमदेवारीवरुन (Madha Lok Sabha) एकीकडे महायुतीमध्ये राडा सुरु असताना, आता महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरु झाली आहे. आगामी लोकसभेसाठी माढाची जागा इंडिया आघाडीतून (INDIA) आम्हांला द्या,अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.  माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpat Deshmukh) यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 


शेकापचे नेते जयंत पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, माढ्याच्या उमेदवारीवर चर्चा केली. डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. 


'महादेव जानकर समर्थन देतील'


दुसरीकडे माढा लोकसभेसाठी रासपचे नेते महादेव जानकर आग्रही आहेत. मात्र शेकापकडून  गणपतराव गायकवाड यांच्या नातवाला उमेदवारी मिळाली तर महादेव जानकर विरोध करणार नाहीत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.  मात्र मविआ जे ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी घेतली. 


महायुतीत माढ्यावरुन राडा


दरम्यान, तिकडे महायुतीमध्येही माढ्याच्या जागेवरुन राडा सुरु आहे. माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून तिकीट जाहीर झालं आहे.  मात्र त्याविरोधात  विजयसिंह मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन माढ्यात गेले होते, त्यावेळी मोहित पाटील समर्थकांनी त्यांची गाडी रोखली होती. भाजपने नाईक निंबाळरांऐवजी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. 


या सर्व राड्यानंतर काल संध्याकाळी मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.  बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले.  गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली.


रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बैठक बोलावली


तिकडे तिकीट जाहीर झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आज आपल्या समर्थकांची बैठक बोलावली. रणजित निंबाळकर यांनी टेंभूर्णी इथं आमदार संजयामामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांच्या फार्म हाऊसवर या बैठकीचं नियोजन केलं आहे. या बैठकीला माढ्यातील 
  सहा पैकी पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. 


माढा लोकसभा क्षेत्रातील आमदार कुणाच्या बाजूने?


माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला, माण खटाव, माढा, करमाळा, माळशिरस असे मतदारसंघ आहेत. यामध्ये  सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजयामामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे .  


संबंधित बातम्या  


माढ्यात राडा, मोहिते पाटील समर्थकांनी गिरीश महाजनांना घेरलं, रणजितसिंहांनी गर्दीतूनच घरात नेलं!     


Madha Lok Sabha: माढा लोकसभेसाठी आज दुसरं महानाट्य; मोहिते पाटलांविरोधात निंबाळकरांचं शक्तीप्रदर्शन, लोकप्रतिनिधींची बोलावली बैठक