Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : माढा लोकसभा (Madha Lok Sabha Election 2024) उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनू लागला असून काल मोहिते पाटील यांच्या नाराजीनाट्यानंतर आज खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) हे आपली ताकद दाखवणार आहेत. आज खासदार रणजित निंबाळकर यांनी टेम्भूर्णी येथील आमदार संजयामामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून यासाठी सहा पैकी पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांनीही हजेरी या बैठकीस असणार असल्यानं मोहिते विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपासाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढाचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजयामामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे . याशिवाय या लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच अशांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे.
यातच मोहिते पाटील याना माळशिरस तालुक्यात विरोध करणारे उत्तम जानकर, रंजन गिरमे यांचेसह सर्व विरोधकांनाही निमंत्रण दिले असल्याचे समजते. मोहिते पाटील समर्थकांनी काल भाजपवर प्रेशर गेमचा वापर केल्याने तोडगा काढण्यासाठी आलेले पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील हतबल झाले होते. आता भाजपकडून निंबाळकर यांनी बोलावलेली बैठक मोहिते पाटील याना एकप्रकारचे उत्तर देण्याचा प्रयत्न असून या बैठकीच्या यशावर भाजप मोहिते पाटील यांच्याशी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील असे बोलले जाते. एकंदर मोहिते पाटील याना पक्षाने विधानपरिषद दिली आहे , याशिवाय त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला मोठे आर्थिक पॅकेज दिले आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यातील विकासकामांसाठी भरीव निधी दिल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. आमच्या दृष्टीने विजयसिंह मोहिते पाटील यांचे पक्षात मोठे स्थान असून त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले असले तरी एकदा केंद्रीय समितीने दिलेले तिकीट बदलण्याची नामुष्की आल्यास याचा फटका राज्यातील अनेक जागांवर बसू शकतो याची जाणीव पक्षाला आहे . यामध्ये खरी मेख मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यातील सुप्त संघर्ष हेच कारण आहे .
रणजित निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या सहकार्याने खासदारकी मिळविली होती. मात्र नंतर मोहिते पाटील यांच्या मनाविरुद्ध रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक लढवले संजयामामा शिंदे यांच्याशी जवळीक साधल्याने मोहिते पाटील समर्थकांत नाराजी होती. मोहिते पाटील हि पश्चिम महाराष्ट्रातील मोठी ताकद मानली जाते, त्यांची नाराजीमुळे माढ्यासोबत सोलापूर, बारामती , सातारा या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसू शकतो. अशावेळी आता भाजप कात्रीत सापडला असून मोहिते याना नाराज केल्यास याचा फायदा शरद पवार उठवू शकणार आहेत. आजही आघाडीकडे माढा लोकसभेसाठी उमेदवारचं नसल्याने त्यांना आयता उमेदवार हाती लागणार आहे.
सध्या मोहिते समर्थकांनी गेल्या पाच दिवसापासून सोशल मीडियात पवारांची तुतारी घेऊन माढा निंबाळकर याना पाडा असे मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीचे मेसेज 2019 साली माढा आणि पवार याना पाडा व्हायरल झाल्याने पवार यांनी स्वतः निवडणूक न लढता संजयमामा शिंदे याना उमेदवारी दिली होती. आता पाच वर्षानंतर परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असली तरी यातील कलाकार मात्र बदलले आहेत. आता मोहिते याना उमेदवारी देऊन बाकीच्या पाच आमदारांना नाराज करायचे कि निंबाळकर याना दिलेली उमेदवारी कायम ठेवून मोहिते पाटील यांची समजूत घालायची एवढाच प्रश्न भाजप समोर आहे. आज निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर हे चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट होणार असून यानंतर प्रदेश भाजपाला याबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. मोहिते पाटील यांची प्लस बाजू आणि मायनस बाजू यातून भाजपाला निर्णय घ्यायचा असून माढ्यासाठी आता फडणवीस यांचा कस लागणार आहे. मोहिते पाटील यांची नाराजी जरी दूर झाली तरी त्यांच्या समर्थकांचे मतदान भाजपकडे वळवणे हे देखील भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात देखील अजूनही मोदींची जादू कायं असून सुप्त मतदार हे मोदींच्या मागे राहणार की पवारांच्या तुतारीला साथ देणार हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे.