सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात  (Madha Lok Sabha Election)  यंदा जोरदार चुरस पाहायला मिळण्याचं चित्र दिसतंय. भाजपने रणजित निंबाळकरांना (Ranjit Nimbalkar) पुन्हा एकदा तिकीट दिल्यानंतर आता मोहिते पाटील गट नाराज आहे. त्यावरून माढ्यामध्ये जोरदार राडाही झाल्याचं पाहायला मिळालं. निंबाळकरांना तिकीट मिळाल्यानंतर आता मोहिते पाटील गट काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता त्याचं उत्तरही समोर आलंय. धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) करमाळ्यापासून त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा पक्ष ठरला नसला तरी ते निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट झालंय. 


विजयसिंह मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. पण भाजपने पुन्हा एकदा रणजित निंबाळकरांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मोहिते पाटील गट नाराज झाला. ही नाराजी दूर करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या गिरीश महाजनांना त्याचा प्रत्यय आला आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 


मोहिते पाटलांचा प्रचार सुरू 


मोहिते पाटील गटाबद्दल भाजपकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. करमाळा तालुक्यातून त्यांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दिसत आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतामध्ये मोहिते पाटील गट आहे.


शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी घ्या


मोहिते पाटलांना भाजपने डावलल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी आता त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्यातरी मोहिते पाटलांनी भाजप सोडण्याबाबत अधिकृत भूमिका घेतली नाही. धैर्यशील मोहिते पाटलांना डावलून निंबाळकरांना तिकीट दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता. 


निंबाळकरांचं तिकीट कापा,  मोहिते पाटलांची मागणी


भाजपने माढ्यासाठी जाहीर केलेल्या उमेदवारीच्या घोषणेला मागे घेऊन त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


दरम्यान, अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीने माढ्यामध्ये मोहिते पाटील बंडखोरी करणार की माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


ही बातमी वाचा :