Buldhana News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच पक्षानी आपला जाहीरनामा प्रकाशित करत मतदारांना साद घातली आहे. अशातच भाजपनेही आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला असून या जाहीरनाम्यावरून राज्याच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गटाने भाजपचे पूर्णतः मांडलीकत्व पत्करलेल आहे. त्यामुळे शिंदे गट हा पूर्णपणे परावलंबी झालेला आहे. यांना मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर भाजपच ऐकावंच लागेल अशी टीका ही प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केलीय. 


काल, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांना भाजपच्या जाहीरनाम्या विषयी विचारले असता, भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजेच महायुतीचा जाहीरनामा असल्याच म्हटल होत. त्यावर भाष्य करताना  खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. 


शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत


शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा (Buldhana Loksabha) मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनाच पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं आहे, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा जागा कोणाची यावरून वाद सुरु होता.आता मात्र फुटलेल्या शिवसेनेत पहिल्यांदाच बुलढाणामधील दोन  शिवसैनिक आमने-सामने आल्याने जनता कोणाला निवडून देणार याची सुद्धा उत्सुकता आहे. जे शिवसैनिक गेल्या तीन दशकांपासून आपलाच उमेदवार निवडून देण्यासाठी लढले, तेच आता आपल्यातील एका शिवसैनिकाला पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत जीवाचे रान करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.


गद्दारीचा फैसला मतदारच करणार 


पक्ष फुटीनंतरही आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक काही आव्हानात्मक नाही. माझी पाटी कोरी आहे त्यामुळे मला निवडणूक सोपी आहे. तसेच गद्दारीचा कलंक असलेल्यांसोबत आमची लढत आहे. त्यामुळे मतदारच या गद्दारीचा फैसला करणार असल्याचे प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले. काल मुख्यमंत्री बुलढण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रतापराव जाधव याना मतदान करा अस म्हटलंच नाही किंवा प्रतापराव यांना  मत द्या, असा एकही शब्द म्हटला नाही. तर त्यांनी मोदींना मतदान करा, अस म्हटलं आहे. त्यावरून माझ्या समोर आव्हान कसं आहे ते ओळखून घ्या. तसेच पुढल्या आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खामगाव येथे भव्य सभा आहे. त्यातच माझ्या विजयावर शिक्का मोर्तब होईल, असा विश्वासही  प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी बोलतांना व्यक्त केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या