मुंबई: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. या ओपनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, तर 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. महाविकास आघाडीचा 20 जागांवरील विजय हा महायुतीसाठी मोठा धक्का ठरू शकतो.


एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला 22 जागांवर विजय मिळेल. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त 6 जागा जिंकता येतील. याउलट महाविकास आघाडीत  काँग्रेसचे 4 खासदार विजयी होतील. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण 16 खासदार विजयी होतील. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या खासदारांचा एकूण आकडा 20 वर जाईल, असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमधून पुढे आला आहे. 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 वर जाईल. तर गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागांवरच विजय मिळू शकतो, याचा अर्थ भाजपचा एक खासदार कमी होईल. गेल्या दोन वर्षांमध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोबत घेतल्यानंतही भाजपची एक जागा कमी होणे, हे धक्कादायक मानले जात आहे. 


लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?


एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 42.7 टक्के इतकी मतं मिळतील. 2019 मध्ये एनडीएला एकूण 50.88 टक्के मिळाली होती. ही भाजप आणि शिवसेनेला मिळालेली मतं होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल 8 टक्क्यांनी घट होईल. तर 2019 मध्ये यूपीए आघाडीला 32.24 टक्के मतं मिळाली होती. मात्र, आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या समावेशानंतर तयार झालेल्या इंडिया आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 42.1 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना यंदाच्या निवडणुकीत 15.1 टक्के मतं मिळतील. 


महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी आहे का?


एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? यामध्ये महाराष्ट्रातील 42 टक्के जनतेने आम्ही समाधानी आहोत, असे सांगितले आहे. तर 27 टक्के जनतेने आम्ही मोदींच्या कामगिरीवर काहीसे समाधानी आहोत, असे म्हटले आहे. 


आणखी वाचा


लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वेळ ठरली