Nilesh Lanke : पारनेरचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुणे पक्ष कार्यालयात भेट घेत पक्षात प्रवेश केला. पवार साहेबांची अदृश्य ताकद माझ्यासोबत होती. मी साहेबांना कधीही सोडून गेलेलो नव्हतोच, असे त्यांनी म्हटले. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 


त्यानंतर आज आ. निलेश लंके हे आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान रस्त्यात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होताना दिसत आहे. रुईछत्तीशी गावात त्यांचे डीजेच्या तालात स्वागत करण्यात आलंय. निलेश लंकेंचा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश दिसून येत आहे. 


निलेश लंकेंच्या स्वागताच्या बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष 


रुईछत्तीशी गावात आ. निलेश लंके यांच्या स्वागताचा एक बॅनर लावण्यात आला. जो सर्वांचे लक्ष वेधत आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो, तुतारी चिन्ह, आ. निलेश लंके, त्यांची पत्नी राणी लंके यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. या बॅनरची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 


निलेश लंकेंचा फडणवीस स्टाईलमध्ये सूचक इशारा


या बॅनरवर "वस्तादाचा पहिला डाव" असा उल्लेख पाहायला मिळतोय. दरम्यान याबाबत निलेश लंके यांना विचारले असता "आगे -आगे देखील होता है क्या?" असं फडणवीस स्टाईलमध्ये सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे. तसेच निलेश लंके यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुतारीचे चिन्ह लावण्यात आले आहे. निलेश लंके यांनी लोकसभा लढवावी म्हणून तुळजाभवानीजवळ कार्यकर्ते साकडे घालणार आहे. 


अजित पवारांनी व्यक्त केली खदखद


निलेश लंके (Nilesh Lanke) जाऊ शकत नाही. त्याला जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा देऊन कोणालाही कोठेही जाता येतं. निलेशला पक्षात मी घेतले होते . त्याला विकास कामांसाठी प्रचंड निधी दिला. माझ्याकडे तो आला होता. काही गोष्टी त्याला मी नीट समजून सांगितल्या. मात्र, काहींनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की, तू खासदार होशील, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. 


काय म्हणाले होते निलेश लंके? 


कोरोना काळात भाऊ भावाला विचारत नव्हता. पती त्याच्या पत्नीला विसरला होता. मी त्या काळात आरोग्य मंदिर  पवार साहेबांच्या नावाने सुरु केले होते. 31 हजार लोकांवर आरोग्य मंदिराच्या माध्यमातून उपचार करता आलेआहेत. माझ्यासोबत पवार साहेबांची अदृश्य ताकद होती. मी या घटना आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. साहेबांना सोडून मी कधी गेलेलो नव्हतोच, असे पक्षप्रवेशावेळी निलेश लंकेंनी म्हटले होते. 


आणखी वाचा 


Electoral Bonds : इकडे सुप्रीम कोर्टाने SBI ला झापलं अन्  तिकडे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा; SBI चा इलेक्टोरल बाँड्स डेटा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार?