मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, मराठा आरक्षण तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचा  प्रश्न  आणि विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नॅरेटिव्ह रोखण्यात अपयश आल्याने राज्यात भाजपला अपयश मिळाल्याची कबुली राज्यातील एका बड्या नेत्याने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तसेच विधानसभेला भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. 23 पैकी फक्त नऊ जागा भाजपला वाचवता आल्या आहेत.  राज्यातील भाजपचा चेहरा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अपयशामुळे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपला निवडणुकांमध्ये  हवं तसं मिळालेले नाही. याला अनेक कारणे आहेत. 


कोणत्या मुद्द्याचा भाजपला फटका बसला?


लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांचा धानाचा मुद्दा, उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचा मुद्दा, मराठवाड्यातील मराठा आरक्षण तसेच उमेदवारांची उशीरा झालेली निवड, उशिराने जाहीर केलेली उमेदवारी याचा फटका बसल्याची कबुली भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. सोशल मीडियात देखील विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नरेटिव्ह थांबवण्यात भाजपला अपयश आल्याची कबुली दिली आहे. 


देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेणार आहेत. काल रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये दिड तास चर्चा झाली होती. या चर्चेत सरकारमधून बाहेर पडण्याची माझी भुमिका ही कोणत्याही नाराजीतून नाही तर राज्यात पक्षसंघटनेला बळकटी आणण्यासाठीच आहे अस देवेंद्र फडणवासांनी अमित शाह यांना सांगितल्याच कळतय. याशिवाय संघटनेच्या कामात तळागाळातील कार्यकर्ता ते स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घेत विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी करता येईल, सरकारच्या बाहेर राहून देखील सरकार व्यवस्थित चालवता येऊ शकत असा विश्वासही दिला. सरकारमधून राजीनाम्याची भुमिकेचा अंतीम निर्णय हे भाजप नेतृत्वच घेईल मात्र त्यांना माझा निर्णय योग्य कसा आहे हे पटवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून केला जाणार असल्याची माहिती आहे


भाजप विधानसभेला मोठा पक्ष ठरणार


एबीपी माझाशी बोलताना वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, सध्या जरी राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण दिसत असले तरी विधानसभेला मात्र आम्ही मोठा पक्ष असणार आहे. 


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष - 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप - 9
शिवसेना (शिंदे गट) - 7
राष्ट्रवादी काँग्रेस - 1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस - 13 
ठाकरे गट-  9
शरद पवार गट - 8