मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. रामटेक ही जागा शिवसेनेकडे राहिली नाही मला याचं दु:ख आहे. मी दोन वेळा रामटेचं प्रतिनिधित्व केलं, मोठ्या फरकाने निवडून आलो. मुकुल वासनिकसारख्या काँग्रेसच्या तगड्या नेत्याला मी दोनवेळा मोठ्या फरकाने हरवलं. कामठीतून महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनुकळे त्यांची जबाबदारी आहे. पराभवाचे विलन बावनकुळेच आहेत. त्यांनी राजिनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी कृपाल तुमाने यांनी केली. विशेष म्हणजे याबाबतची तक्रार भाजपचे दिल्लीतील नेते अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Continues below advertisement

बावनकुळे यांनी शिंदे साहेबांवर दबाव टाकला- तुमाने

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोणता सर्वे केला मला माहिती नाही. मात्र त्यांनी हट्ट धरला की ही जागा मला मिळायला नको. त्यांनी शिंदे साहेबांवर दबाव टाकला की ही जागा इतर कुणाला द्या. ज्यांचा विधानसभेमधे परफॉर्मन्स चांगला नाही त्यांच्यावर कारवाई करू असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या कामठीमधून या उमेदवाराला सगळ्यात कमी मतं मिळाली. त्यामुळे आता बावनकुळे काय करावाई करतात हे पाहावं लागेल, अशी नाराजीही तुमाने यांनी व्यक्त केली.

राजू पारवेंना केवळ 1 टक्के लोकांची पसंती

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मला तिकिट मिळू दिले नाही. आम्ही 42 उमेदवारांना निवडणून आणण्याची जबबादारी घेतो, मात्र तुमानेंना तिकिट मिळालं तर आम्ही 41 उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, असं बावनकुळे अमित शाह यांना म्हणाले होते, असं मला समजलं आहे. मला पक्षाच्या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर राजू पारवेंना केवळ 1 टक्के लोकांनी पसंती दिली होती, असा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला.

Continues below advertisement

अमित शाहांकडे जाऊन याबाबत तक्रार करणार

जेव्हा आम्ही भाजपसोबत आलो तेव्हा 12 खासदारांना मी मोबलाईज करून एकत्र आणलं होतं. तेव्हा अमित शाह मला म्हणाले होते तुमच्या सर्व 12 खासदारांना तिकिट मिळेल ही माझी जबाबदारी आहे, असं म्हणत मी अमित शाहांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार आहे, अशी माहितीही कृपाल तुमाने यांनी दिली.

भाजप काय उत्तर देणार? 

दरम्यान, तुमाने यांच्या या आरोपानंतर आता महायुतीमध्ये नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तुमाने यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केला आहे. त्यामुळे आता भाजप याला नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा :

राष्ट्रवादीचे आमदार खरंच नाराज आहेत? 15 सेंकदांच्या प्रतिक्रियेत अजितदादांनी विषय संपवला!

उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार