Lok Sabha Elections 2024: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पाचव्या टप्प्यासाठी 49 जागांवर मतदान (Voting) सुरू झालं आहे. या टप्प्यात 8.95 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासोबतच ओदिशातील (Odisha) 35 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 13 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (20 मे) मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील 49 जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 695 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी अनेक उमेदवार असे आहेत, ज्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली कोट्यवधींची संपत्ती जाहीर केली आहे. तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कोट्यवधी उमेदवार कोण? जाणून घेऊयात... 


पीयुष गोयल (Piyush Goyal): केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यावेळी मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 110 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पियुष गोयल यांच्याविरोधात लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील उतरले आहेत. त्यामुळे मुंबई उत्तर मतदारसंघात गुलाल कोण उधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अनुराग शर्मा (Anurag Sharma) : उत्तर प्रदेशच्या झाशी लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अनुराग शर्मा यांना तिकीट दिलं आहे. ते श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा. लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. अनुराग शर्मा यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 212 कोटी रुपये आहे. त्यांच्या जंगम मालमत्तेचं मूल्य 95 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचं मूल्य 116 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


निलेश भगवान सांबरे (Nilesh Bhagwan Sambare) : नीलेश भगवान सांबरे हे महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सांबरे यांच्याकडे 116 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये 32.7 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्ता आणि अंदाजे 83.3 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.


सुरेश गोपीनाथ म्हात्रे (Balya Mama-Suresh Gopinath Mhatre) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटानं सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. त्यांच्याकडे 107 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, म्हात्रे यांच्यावरही 75 कोटींची देणीही आहेत. 


कृष्णा नंद त्रिपाठी (Krishna Nand Tripathi) : झारखंडच्या चतरा मतदारसंघातून काँग्रेसनं कृष्णा नंद त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी 70 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.


कोणत्या पक्षात किती करोडपती?


पाचव्या टप्प्यात 695 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यापैकी 227 उमेदवार कोट्यधीश आहेत. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या प्रति उमेदवाराची सरासरी मालमत्ता 3.56 कोटी रुपये आहे. समाजवादी पक्षाचे सर्व 10 उमेदवार कोट्यधीश आहेत. याशिवाय शिवसेनेचे 6 आणि राजदचे 4 उमेदवार कोट्यधीश आहेत. ADR नुसार, भाजपच्या 40 पैकी किमान 36 उमेदवारांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती जाहीर केली आहे. काँग्रेसच्या 18 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांकडे एक कोटीहून अधिक संपत्ती आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज; देशभरात 49 जागांवर मतदान, राहुल गांधी, स्मृती इराणी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिष्ठा पणाला