Bhiwandi Lok Sabha Election 2024 : भिवंडी : भिवंडी लोकसभेची (Bhiwandi Lok Sabha Election 2024) निवडणूक तिरंगी होणार असल्याची चिन्ह स्पष्ट झाली आहे. भाजपचे कपिल पाटील (Kapil Patil) तिसऱ्यांदा खासदाकीच्या रिंगणात हॅट्रिक करण्यासाठी उतरले आहेत. तर त्यांच्या समोर कडवं आव्हान देण्यासाठी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आणि राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या यांनी शड्डू ठोकले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. त्यानंतर ही तिरंगी लढत आता मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपलं मताधिक्य वाढविण्यासाठी झगडत आहेत.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 'चार सौ पार'चा नारा दिल्यानंतर कपिल पाटील यांच्यासाठी देखील यावेळची ही निवडणूक हॅट्रिक करण्याच्या दृष्टीनं महत्वाची मानली जात आहे. कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मोर्दींना तर महाविकास आघाडीकडील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांना या ठिकाणी प्रचारात उतरावं लागेल.  


या दोघांच्या लढतीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष असलेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी देखील आपल्या सामाजिक कामच्या जोरावर निवडणूक रिंगणात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांसह अनेक नामांकित मुस्लीम, कुणबी, मराठा संघटनांनी त्यांना पाठींबा देत त्यांची ताकद वाढवली आहे. यामुळे या मतदार संघात निलेश सांबरे यांनी प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेत वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याआधी पासून कपिल पाटील, सुरेश म्हात्रे यांना स्व-पक्षांतर्गत तसेच सहकारी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. ही नाराजी दूर करता करता त्यांची अर्धी शक्ती वाया गेली. 


उलट दिवसेंदिवस अनेक स्तरांतून मिळणारा पाठींबा आणि प्रचारात अगदी सुरुवातीपासूनच निलेश सांबरे यांनी घेतलेली आघाडी तसेच प्रचारात विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं सामाजिक काम लोकांना पटवून देत त्याचपद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपात मतदार संघात करण्याचा विश्वास जनतेत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. गाव-पाडे, वाड्या-वस्त्या या ठिकाणी त्यांचं काम गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामन्यां जनतेपर्यंत पोहचलं होतं. कधीही विद्यामान खासदार पोहचले नव्हते अशा  गावात सांबरे यांनी स्वत: भेटी दिल्यानं ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला होता. त्यामुळे आपोआपच प्रत्येक माणूस त्यांच्या प्रचारात जिजाऊ संस्थेसोबत जोडला गेल्याचं पाहायला मिळालं. 


भिवंडी मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, शहापूर-मुरबाडमधील पाणी प्रश्न, भिवंडीतील डबघाईला आलेला यंत्रमाग उद्योग, टोरेंट पॉवर विजेचा प्रश्न, एकही वीट न लागलेली मेट्रो आणि कल्याण-मुरबाड रेल्वे या बरोबरच मतदारसंघातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, घाणीचं साम्राज्य या समस्या 'जैसे थे' आहेत. या मुद्द्यांबाबत कपिल पाटील यांना मतदारांनी प्रश्न विचारून निरुत्तर केल्याचं पहायला मिळालं. शिवाय मोदींनी केलेल्या कामाशिवाय कपिल पाटील हे आपल्या प्रचारात स्वत:चं असं वेगळं काहीच सांगू शकले नाहीत. हा मुद्दा जनतेतून सर्वत्र चर्चिला जात असल्यानं मतदार राजा आपल्या मतांचं बोट त्यांच्याकडे कितपत वळवतील हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.


सुरेश म्हात्रे यांच्या पक्षनिष्ठा आणि स्थिरता या दोघांबाबत आणि येथील जनतेच्या मनात आजही संभ्रमच असल्यानं हा संभ्रम त्यांच्या मतपेटीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. याच बाबीचा नेमका फायदा निलेश सांबरे यांना होईल, असे संकेत दिसत आहेत. पालघर-ठाण्यापासून संपूर्ण कोकण पट्ट्यात सांबरे यांनी गेल्या 15 वर्षांपासून अनेक सामाजिक कामं उभी केली आहेत. त्यांच्या संस्थेमार्फत गरीब-गरजूंना पूर्णतः मोफत लाभ दिला जातो. हेच सामाजिक काम त्यांची मोठी जमेची बाजू ठरलं आहे. या सुविधांचा लाभ घेतलेले लाखो नागरिक-कुटुंबं, स्पर्धा परीक्षांतून शासकीय सेवेत लागलेले हजारो युवक आपली शक्ति आहे, असा विश्वास सांबरे यांना आहे. त्यामुळे आता एकूणच भिवंडी लोकसभा मतदार संघात भाकरी फिरणार का? हे येत्या 4 जून रोजी मतमोजणीनंतरच कळेल.