Lok Sabha elections 2024 Phase Three : देशात लोकसभा निवडणुकांसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. आलीकडे वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता मतदारांनी सकाळच्या सुमारास मतदान करण्यास प्राधान्य दिले आहे. तर सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात एकूण 6.64 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.


असे असले तरी लातूर (Latur) जिल्ह्यातील सांगवी सुनेगाव या गावात आतापर्यंत एकाही नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागणी पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी आतापर्यंत या मतदानकेन्द्रावर शून्य टक्के मतदान झाले आहे.


गावकऱ्यांनी मतदानाकडे फिरवली पाठ 


लातूर नांदेड हायवे वर कट पॉईंट देण्यात यावा या मागणीसाठी गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. सांगवी सुनेगाव येथील ग्रामस्थांची मागील अनेक दिवसापासून हायवेला कट पॉईंट मिळण्याची मागणी होती. मात्र प्रशासन काही केल्या ती पूर्ण करत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला त्यांनी यापूर्वीच दिली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही किंवा लेखी आश्वासनही देण्यात आलं नाही. यामुळे गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या मतदानकेंद्रांवर गावातील एकही नागरिक या मतदान केंद्रांवर फिरकला नाहीये. या गावात 477 मतदार असून या सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 


सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात एकूण 6.64 टक्के मतदान 


राज्यात आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. वाढत्या उन्हाचाही परिणाम या लोकशाहीच्या महोत्सवावर झाला असल्याचे दिसून आले आहे. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून सर्व स्थरावरील प्रशासन सज्ज झाले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी 789 केंद्रावर पेंडोल, केंद्रावरील खोल्यांमध्ये पंखा, बसण्यासाठी खुर्च्या अशा प्रकारे सर्व सुसज्ज सुविधा उपलब्ध करुन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयारी केली होती. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून वाढते ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. आज राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. यात राज्यात एकूण 6.64 टक्के मतदान झाले आहे. 


पहिल्या दोन तासांतली मतदानाची टक्केवारी


1. लातूर – 7.91 %
2. सांगली – 5.81 %
3. बारामती – 5.77 %
4. हातकणंगले – 7.55 %
5. कोल्हापूर – 8.04 %
6. माढा – 4.99 %
7. धाराशिव – 5.79 %
8. रायगड – 6.84 %
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 %
10. सातारा –7.00 %
11. सोलापूर – 5.92 % 


इतर महत्वाच्या बातम्या