जळगाव : भारतीय जनता पार्टीनं रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केली. भाजप उमेदवार रक्षा खडसे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. 


एकनाथ खडसे काय म्हणाले? 


रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांनी मागील काळात चांगले काम केल्याचं म्हटलं. रक्षा खडसेंना त्यामुळंच पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे, असं खडसेंनी म्हटलं. जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद आजपर्यंत दिला आहे त्यामुळे त्या विजयी होतील, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. आपला भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला तरी आपण भावी काळात भाजप मधे प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 


जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रक्षा खडसे यांनी  आपल्या घरातील देवांच्या पुजे सह मुक्ताई मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. त्याच बरोबर सासरे एकनाथ खडसे यांचे देखील आशीर्वाद घेतले आहेत.  


रक्षा खडसे काय म्हणाल्या?


शुभकार्य करत असतो त्यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतो. आज तिसऱ्यांदा अर्ज भरत असताना सर्वांचे आशीर्वाद घेणार आहे. एकनाथ खडसे प्रचार सभेला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, ते त्यांच्या पातळीवर प्रचाराचं काम करतील. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचे देखील आशीर्वाद घेणार आहे. आम्ही शक्तीप्रदर्शन करण्यापेक्षा कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. समोर कोणी जरी उभं असलं तरी या निवडणुकीकडे विकासाच्या दृष्टीनं बघते आहे. मोदींच्या आशीर्वादानं उमेदवारी मिळालेली आहे, तुम्ही समजू शकता कौल कुणाच्या बाजूनं आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या.


दरम्यान, स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील अनेक लोकं उपस्थित राहणार आहेत. 


संबंधित बातम्या : 



परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या