Lok Sabha Election 2024: मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे. नाशिक लोकसभेबाबात (Nashik Lok Sabha) महायुतीतील (Mahayuti) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे.
महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली. तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंसाठी शक्तीप्रदर्शन
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमदेवारीसाठी शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची घोषणाच केली होती. मात्र त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी वादावादी झाली होती.
वादानंतर भाजपचे बडे नेते फडणवीसांच्या भेटीला
हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपचे नाशिकचे बडे नेते थेट मुंबईत पोहोचले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, नाशिकमध्ये भाजपचाच उमेदवार देण्याचा आग्रह केला होता.
छगन भुजबळ यांची बाजी
एकीकडे शिवसेना आणि भाजपची ही वादावादी सुरु असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनी बाजी मारल्याचं दिसतंय. कारण छगन भुजबळ यांनी पुतण्या समीर भुजबळ किंवा आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यातील जागेचा दावा सोडला. त्याबदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळाली.
हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला निघाले आहेत. मुंबईत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
नाशिकच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी
एकीकडे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकची जागा सोडणार नाही. कोणाची मर्जी राखावी म्हणून जागेची अदलाबदल होत नाही. तीन टर्मचा आमचा खासदार असताना नाशिकची जागा सोडणं अशक्य, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ठाकरेंच्या यादीनंतर दोन संजय भिडले, खिचडी चोर म्हणणाऱ्या निरुपमांना राऊतांचं जशास तसं प्रत्युत्तर
पाहा व्हिडीओ : Chagan Bhujabal Nashik : नाशिकमधून छगन भुजबळ लढणार, उदयन राजेंचं तिकीट कन्फर्म : ABP Majha