Lok Sabha Election 2024 : मुंबई : मुंबईत (Mumbai News) पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) संयुक्त पत्रकार परिषदेत आज अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. अंतिम जागावाटपात काँग्रेसकडे (Congress) 17 जागा, ठाकरे गटाकडे (Shiv Sena) 21, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Nationalist Congress Sharad Chandra Pawar Group) 10 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसेच, पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा मविआमधील (MVA) प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं झाली. काही काळ बंद दाराआड चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमध्ये या पत्रकार परिषदेनंतर चर्चा झाली. दरम्यान, महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर झाला असला तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. 


महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर मविआ नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते काही न बोलताच निघून गेले. तर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मुंबईत न मिळाल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. ज्या जागा आम्ही निवडणून येऊ शकतो, त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत, असं काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचं मत आहे. तसेच, ज्या जागांवर आमची ताकद नाही, अशा जागा देण्यात आल्याची नाराजीही काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. 


राज्यातील काँग्रेस नेत्यांची वर्षा गायकवाडांकडून दिल्लीत तक्रार 


राज्यातील काँग्रेस नेत्यांची वर्षा गायकवाडांकडून दिल्लीत तक्रार केली आहे. केसी वेणुगोपाळ यांना फोन करुन वर्षा गायकवाड यांनी तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघांबाबत भूमिका घेतली नाही, अशी तक्रार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राहुल गांधी यांची मुंबईत यात्रा दाखल झाली होती, त्यावेळी सर्वात जास्त प्रतिसाद धारावीतून मिळाला होता, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळावी, असा आग्रह वारंवार वर्षा गायकवाडांकडून केला जात होता. मात्र ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. 


सांगलीची जागा ठाकरेंकडेच, विशाल पाटील नाराज? अपक्ष लढणार? 


गेल्या अनेक दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. ही जागा काँग्रेसलाच मिळेल असा विश्वास आमदार विश्वजीत कदमांसह विशाल पाटील यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याची भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील बोलून दाखवली होती. मात्र, अखेर जागावाटपात ठाकरे गटाला ही जागा देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील सांगली लोकसभेची जागा लढवणार आहेत. त्यामुळं आता विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जातोय.