सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) तोंडावर मराठा - ओबीसी (Maratha - OBC) संघर्ष संपवण्यासाठी केलेले आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे. पुलाखालून पाणी वाहत असताना पवार इतके दिवस शांत का बसले? असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर तोफ डागली आहे. मनोज जरांगे हे त्यांना चावी देणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन मोकळे होतील, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले. आज ते पुणे दौऱ्यावर जाताना पंढरपूरमध्ये थांबले होते . यावेळी त्यांनी माझाशी खास संवाद साधला.
गेली दोन वर्षे महाराष्ट्राचे वातावरण दूषित होत असताना शरद पवार हे शांत का होते? आता त्यांनी विधानसभेच्या तोंडावर केलेले बैठकीचे आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे. पवार हे गेली दोन वर्षे करत आहेत पण मग जरांगे नावाचा भस्मासूर या महाराष्ट्रात कोणी केला असा सवाल हाके यांनी पवार यांना केला आहे. हा भस्मासूर एवढा मोठा होऊन समाजातील वातावरण बिघडत जाणे हे पवार आणि महाराष्ट्र दोघांसाठीही त्रासदायक असल्याचे हाके यांनी सांगितले . पुलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यावर आता अशा पद्धतीचे पवारांचे वक्तव्य म्हणजे म्हातारपणी शृंगार केला या ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे असल्याचा टोला लगावला.
आम्ही सर्व प्रकारची लढाई लढण्यास तयार : लक्ष्मण हाके
वर्षभर राज्यात अराजकता असताना बीड सारखे शहर जळत असताना तुम्ही लोकसभेत माणसे निवडून आणून स्वतःची पोळी शेकली अशी टीका केली . आता विधानसभेच्या तोंडावर तुम्हाला हे शहाणपण सुचते आहे का असा सवाल हाके यांनी केला . तुम्ही पुरोगामी नेते आहेत तर संविधानाला अपेक्षीत असणारी भाषा बोला ना, तुम्ही एकत्रीत बसा आणि निर्णय घ्या असली भाषा तुम्ही करणार असाल आणि संविधानाच्या विरोधात कोणाची मागणी असेल तर ती ओबीसी कदापी मान्य करणार नाही असे खडसावून सांगितले. अशी बैठक झाल्यास आम्ही नक्की जाऊ आणि तेथे संविधानाची आणि कायद्याचीच भाषा बोलू असे सांगत कोणी तरी गरीब झालाय म्हणून त्याला ओबीसींमधून आरक्षण द्या म्हणाल तर ते अजिबात चालणार नाही आम्ही ते चालवू देणार नाही यासाठी रस्त्यावरची , बॅलेटची सर्व प्रकारची लढाई लढण्यास ओबीसी तयार असल्याचा इशारा हाके यांनी दिला .
जरांगे बिनबुडाचा लोटा : लक्ष्मण हाके
जरांगेनी काय कोणाला पाडावे त्यांनी एकट्याने उभे राहून दाखवावे असे आवाहन देत त्यांचा प्रोग्रॅम ठरलेला असून त्यांचा रिमोट कंट्रोल चालवणारा महाराष्ट्रातला नेता आहे. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतील असा थेट आरोप जरांगे यांच्यावर केला . तो पाठिंबाही निखळ नसून तोही 96 कुळी , 92 कुळीला देतील आणि त्या पक्षाचा कोणी ओबीसी असेल तर त्याचा पराभव करतील असा टोला लगावला . ज्या पद्धतीने लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मधून महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला याचे उदाहरण हाके यांनी दिले . जरांगे दर दहा मिनिटाला आपली भूमिका बदलत असतो , तो बिनबुडाचा लोटा आहे.
ओबीसी समाज असंघटित आहे या भ्रमात कोणी राहू नये : लक्ष्मण हाके
गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आपल्या बाजूने कोण बोलले कोणी पाठिंबा दिला याचे ऑडिट करत असून अशा कोणत्याही आमदाराला मतदान करायचे नाही हा आमचा निर्णय आहे . कधीही महाराष्ट्रात जनगणना केली तरी 50 ते 60 टक्के आम्ही ओबीसी असून आमची ताकद या विधानसभेत दिसेल असा इशाराही हाके यांनी दिला. ओबीसी समाज असंघटित आहे या भ्रमात कोणी राहू नये या विधानसभेला आपल्या हक्कासाठी समाज नक्कीच योग्य ठिकाणी मतदान करून ताकद दाखवेल असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला .
जरांगे नावाच्या खुळखुळ्याला आम्ही अजिबात स्थान देत नाही : लक्ष्मण हाके
ओबीसी घाबरला म्हणणाऱ्यांनी नक्की निकाल पाहावेत असे सांगताना जरांगे नावाच्या खुळखुळ्याला आम्ही अजिबात स्थान देत नसून हा भस्मासूर महाराष्ट्र आणि पवार नावाच्या पुरोगामी राजकारण्याचे राजकारण देखील उद्ध्वस्त करेल असा इशाराही हाके यांनी दिला. आम्ही पहिले मतदान ओबीसीला आणि दुसरे मतदान एस्सी आणि एसटी यांना करायला लावणार आहे. आपले हक्क आणि आरक्षण वाचवण्याचे आवाहन आम्ही सर्व समाजबांधवांना करून एकत्रित मोट बांधणार मग होऊन जाऊदे दूध का दूध असे आवाहन जरांगे यांना दिले.
हे ही वाचा :