Manoj Jarange on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना तुम्ही 88 उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि 8 जागा निवडून आणून दाखवा, असे आव्हान दिले होते. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर शांतता रॅलीच्या सांगता सभेतून जोरदार टीकास्त्र डागले आहे. भुजबळ नाशिकला लागलेली साडेसाती आहे. येवल्याला लागलेला डाग पुसणारच असे त्यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर जोरदार टीका 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जातिवंत, कडवट, कट्टर म्हणजे काय हे नाशिकच्या जनतेने दाखवून दिले आहे. तुम्ही मराठवाड्यापेक्ष्या मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती, ते म्हणत आहेत की, मनोज जरांगेंना म्हणा 8 जागा निवडून आणून दाखवा. तुझ्याच जिल्ह्यातील निवडून येतात का बघ आधी? देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष भुजबळ संपवतील. छगन भुजबळांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, आता भाजप फोडतील. माझ्या नादी लागू नको, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. 


येवल्याचा डाग पुसून टाकणार 


ते पुढे म्हणाले की,  फडणवीस देखील वेडयासारखे वागत आहेत. तुमच्या येवल्याचे नाव यावेळेस पवित्र होणार आहे. येवल्याचा डाग पुसून टाकणार आहे. त्याचा मी कार्यक्रमच लावतो. जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाला त्रास देईल, त्याला आडवे केले. देवेंद्र फडणवीस सर्वांना पाणी पाजतात. त्यांना मी भेटलो काय करावे हे त्यांना आता कळत नाही. 


ओबीसीमधूनच आरक्षण घेणार 


कुणबी आणि मराठा एकच आहेत. नाशिक जिल्ह्यातील गावागावातील मराठ्यांनी 29 तारखेला अंतरवालीला यायचे आहे. निवडणुकीत पाडायाचे का उभे करायचे? हे 29 तारखेला ठरवू. आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवायचे आहे. ओबीसीमधूनच आरक्षण घ्यायचे आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा समाजाला बाप माना. आरक्षण मिळत नाही, म्हणून आपले लेकर मोठे होत नाही. 13 जून ते 13 ऑगस्ट हे दोन महिने सरकारला दिले. या काळात काहीच हालचाल झाली नाही. त्यांना आरक्षण द्यायचे नाही किंवा भाजपमधील लोक आणू देत नाही. आता नवीन डाव आणले आहेत. बैठकीला या म्हणत आहेत. हे जात नाही, आणि आपले मरण होत आहे. 


लोकसभेत कार्यक्रम केला, जोरात पडले


आपण 10 टक्के आरक्षण मागितले होते का? त्याची व्हॅलिडीटी दिली नाही. मी मागे लागलो म्हणून थोडी वाढवली. आता ईडब्ल्यूएस आरक्षण गेले तर म्हणतात मराठा आरक्षणाच्या मागणी मुळे गेले. माझ्या विरोधात विधानपरिषदेचे आमदार बोलताय. विधानसभेचे आमदार बोलत नाही. लोकसभेत कार्यक्रम केला. तुम्ही लई जोरात पडले, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला डिवचले.  


आणखी वाचा 


Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर शेलक्या भाषेत टीका; म्हणाले, रस्त्यावर खुर्ची टाकून बसले तरी...