मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये (BJP) असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे (Laxman dhobale) यांनी आपण भाजप सोडत असल्याचे म्हटले. मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, अशी घोषणाच लक्ष्मण ढोबळेंनी केलीय. 


राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतेच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यातच, आता लक्ष्मण ढोबळे यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. 


अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो, आता ते भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देऊ लागले. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता पुन्हा मी भाजप सोडत आहे, असे म्हणत लक्ष्मण ढोबळे यांनी तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केलीय. अजित पवारांना वाटतं की, पैशांचा जिवावर राजकारण करता येतं, मात्र तसं होत नाही. तुमच्या काकांनी कसं राजकारण केलं ते पाहा, असा सल्लाही ढोबळे यांनी अजित पवारांना दिलाय. तसेच, मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेश निश्चित आहे, अशा शब्दात एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण ढोबळे यांनी नाराजी व्यक्त करत हाती तुतारी घेत असल्याचे जाहीर केले.


दरम्यान, लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. तर, राष्ट्रवादीत असताना ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. 


मोहोळमध्ये महाविकास आघाडीकडून कोण


मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे आहेत. ते राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यांच्यामागे माजी आमदार पाटील यांची भक्कम साथ आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाकडून यशवंत माने यांनांचं तिकीट मिळेल. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे आक्रमक झाले आहेत. यशवंत माने यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध करत दोन दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे, मोहोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


हेही वाचा


राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी