लातूर: लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा 61881 मतांनी पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) हे विजयी झाले. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते विक्रमी मत घेत लातूर (Latur Lok Sabha) भाजपाचा गड असल्याचा सिद्ध केलं होते. मात्र, या निवडणुकीत हॅट्रिक करण्याची संधी भाजपाला (BJP) मिळाली नाही. भाजपाच्या पराभवाची आता उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे. भाजपातील अंतर्गत कलह, ढिसाळ नियोजन, गटबाजी यामुळे भाजपाचा पराभव झाल्याची चर्चा होत आहे. केंद्रस्थानी आहेत अर्थातच भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर आपल्यावरील सर्व आरोपांचे उत्तर देण्यासाठी त्यांनी निलंगा येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी लातूरमधील पराभवाची कारणमीमांसा केली.
पराभवाची सांगितली जाणारी कारणे
भाजपाचा उमेदवार ठरवून भाजपानेच पाडला. भाजपच्या जिल्ह्यातील तीन आमदारात एकी नसल्याने उमेदवार पडला. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पसंतीचा उमेदवार नव्हता. उमेदवाराबद्दल मतदार संघात नाराजी होती ती नेत्यांना दूर करता आली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यापासून संघटना स्तरावर यंत्रणा उभीच राहिली नाही. भाजपाने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्ते नेते अपयशी ठरले. तसेच जातीय समीकरण साधण्यात भाजपाला आलेलं अपयश, हे लातूरमधील पराभवाचे मुख्य कारण सांगितले जात आहे. यासारख्या अनेक मुद्द्यावर सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.
लातूर जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार आहेत. निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि विधान परिषदेतील आमदार रमेश कराड. या निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार हे धाराशिव मतदारसंघांमध्ये सक्रिय होते. रमेश कराड हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घरी होते. त्यातच उदगीर आणि अहमदपूर येथील आमदार संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार यांनी प्रचार केला. मात्र, ते प्रभाव टाकू शकले नाहीत. यामुळेच भाजपाच्या उमेदवाराचा लातूरमध्ये पराभव झाल्याचे सांगितले जाते.
सर्वस्वी जबाबदारी माझीच: संभाजी पाटील निलंगेकर
अनेकांनी उमेदवारी मागितली होती. त्यापैकी सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. आम्ही कामाला लागलो. जिल्ह्यातील एकूण असलेली राजकीय परिस्थिती, मतदारसंघनिहाय असलेली जातीय समीकरणं, भाजपाची यंत्रणा या सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं चांगली मतही मिळवली. मात्र, विजयी मतांचं समीकरण जुळवता आलं नाही. अनेक जण अनेक आरोप करत असतात. ते निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र तोपर्यंत कोणीही बोलत नसते. कारण पराभवाला कुणी वाली नसतो. विजयाचे दावेदार सगळेच असतात. मी याची सर्वस्वी जबाबदारी घेतो, असं स्पष्ट मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी जातीय समीकरणे आहेत. त्यातच काँग्रेसचा उमेदवार हा निलंगा मतदारसंघातील असल्याने भूमिपुत्र असल्याने निलंग्यातून मताधिक्य मिळालं. मात्र, लातूर ग्रामीण लातूर शहर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात लीड अपेक्षित होती ते रोखण्याचे काम ही आम्ही केलं त्याला नाकारून कसे चालेल. निगेटिव्ह टोनमध्ये प्रभावाचे विश्लेषण केलं चाललंय, बदनामी केली जात आहे, मी माझं मत मांडला आहे, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले.
पुन्हा एकदा सांगतो पराभवाला कोणी वाली नसतो. मतदान होईपर्यंत भाजपाने ही काम केलं. काँग्रेसनेही काम केलं. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला म्हणून आज ही चर्चा होत आहे. निवडणुकीचा प्रमुख मी होतो यामुळे सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, असं स्पष्ट मत भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लातूर लोकसभेतील मतांची आकडेवारी
डॉक्टर शिवाजी काळगे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळवण्यात यश आला आहे. तर निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना पाच लाख 47 हजार 140 मते पडली. डॉक्टर शिवाजी काळगे यांनी 61881 मताची भरघोस आघाडी मिळवून यश संपादन केले.
मतदारसंघनिहाय लीड
* लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून 29 हजार 924 मताची लीड काँग्रेसला मिळाली आहे
* लातूर ग्रामीण मतदार संघ 17195 मताची लीड काँग्रेसला मिळाली आहे
* अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून 3495 मताची लीड भाजपला मिळाली आहे.
* उद्गीर विधानसभा मतदारसंघातून 4796 मताची लीड भाजपाला मिळाली आहे
* निलंगा विधानसभा मतदारसंघातून 20217 मताची लीड काँग्रेस मिळाली आहे
* लोहा विधानसभा मतदारसंघातून 8488 मताची ही काँग्रेसला मिळाली आहे.
* पोस्टल मतदाना 318 मताची लीड काँग्रेसला मिळाली आहे.
आणखी वाचा
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'