मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याचा धुरळा बसतोय न बसतोय तोच आता आरोप आणि प्रत्यारोपांचा फुफाटा उडू लागलाय. महायुतीच्या पराभवाला भाजपच कसा जबाबदार आहे? हे सांगण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांची नुसती चढाओढ लागलीय. मात्र त्यातही फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचीही चर्चा आता जोरात रंगलीय. 


सर्व्हेचे कारण सांगत उमेदवारी नाकारली असं भावना गवळी म्हणताहेत. उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने पराभव झाल्याचं आपला पराभव झाल्याचं हेमंत गोडसे म्हणाले. तर सर्व्हे नावाचं भूत आता डोक्यावरून उतरेल असं संजय शिरसाट म्हणाले. महायुतीत नुसता आता आरोप, टीका, टोमणे आणि सल्ल्यांचा भडीमार आणि वादाचा नुसता कल्ला सुरू आहे. 


लोकसभेच्या प्रगतीपुस्तकावर असमाधानकारक शेरा


ही परिस्थिती निर्माण झालीय महायुतीतील नेत्यांची आणि त्याचं कारण आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रगतीपुस्तकावर मारला गेलेला शेरा. तो आहे अत्यंत असमाधानकारक आणि या शेऱ्यानंतर भाजपला घेरण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांचं आग्यामोहोळ उठलंय. 


शिंदे गटाचं भाजपच्या सर्व्हेवर बोट


महाराष्ट्रातील मतदारराजाने महायुतीच्या पारड्यात म्हणावी तशी मतांची बिदागी दिली नाही. त्यामुळे महायुतीचा आकडा काटकुळाच राहिला. त्याची कारणं सांगताना काही नेते राजकारणही सांगू लागलेत. कृपाल तुमाने यांनी तर 
लोकसभेच्या पडद्यावरील मतांचा पिक्चर आपटण्यामागे बावनकुळेच व्हिलन असल्याचं म्हटलंय. तर शिंदे गटाच्याच भावना गवळी यांनी भाजपने केलेल्या सर्व्हेवर बोट ठेवत थेट हल्ला चढवलाय.


इतकंच नाही तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी डोक्यातील सर्व्हे नावाचं भूत आता उतरेल म्हणत भाजपवरच आरोपांचा बाण सोडलाय. तर हेमंत गोडसेंनी पराभवाचं कारण सांगतानाउमेदवारी जाहीर करण्यात झालेल्या लेटमार्कवर बोट ठेवलंय.


भाजपवर होणाऱ्या या सगळ्या आरोपांच्या भाऊगर्दीत अजित पवार गटाचे नेते फारसे नाहीत. जे आहेत, ते सर्व शिंदे गटाचेच ही गोष्टही इथे लक्षात घेण्यासारखी. तेही असो, पण खरंतर एखादं जहाज बुडायला लागलं की त्यातून उडी मारण्याची घाई सर्वांनाच असते. 


महायुतीच्या जहाजाने हेलकावे खाल्ले


महायुतीचं जहाज बुडायला लागलं असं म्हणता येणार नाही. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या जहाजाने हेलकावे खाल्ले का? तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच द्यावं लागेल. त्यामुळे नुसत्या हेलकाव्यांनीच महायुतीतील नेत्यांची आरोप करण्यासाठी नुसती मुरकंड उठलीय. गेलाबाजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हणत थोडासा का होईना पण कॅप्टनपदाचा आब राखलाय. 


फडणवीसांची नैतिकता अन् जबाबदारी स्वीकारली


पण या सगळ्यात जास्त लक्षात राहिले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मोठ्या पडझडीनंतरही एखादा सेनापती खंबीरपणे उभा राहावा तसे देवेंद्र फडणवीस निकालानंतर लगोलग पुढे आले आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे पराभवानंतरच्या या सगळ्या गदारोळात फडणवीसांनी दाखवलेलं औदार्य आणि नैतिकता मात्र महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिली आणि हेही नसे थोडके. 


ही बातमी वाचा: