शिर्डी : साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून विखे पिता पुत्रांची वेगवेगळी भूमिका असल्याचे समोर आले आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकरण्याची मागणी केली होती. शिर्डीतील साईबाबा (Sai Baba Mandir) संस्थानने मोफत जेवण बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली. प्रसंगी या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देतात. मात्र यामुळे शिर्डीत भिकार्‍यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावं आणि  मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा ही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलीय. 


तर दुसरीकडे सुजय विखे यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची (Radhakrishna Vikhe Patil) विरोधी भूमिका असून ते म्हणाले की साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचीही स्पष्टोक्ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून त्या अनुषंगाने सुजयने ते वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया शिर्डीचे आमदार तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.


वेळीच सुजय विखे पाटलांनी माफी मागावी- अक्षयमहाराज भोसले


शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. मात्र आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप करु नये, याउलट भिकारी असे संबोधन करने हे दुर्दैवी आहे. कारण अन्नदान क्षेत्रात सर्वसामान्य सगळेच प्रसाद घेत असतात. असे म्हणत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भूतकाळात शिर्डीमध्ये साईबाबांना कोणी पळीभर तेल दिले नव्हतं. आता पुन्हा तशीच भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये, वेळीच सुजय विखे पाटलांनी माफी मागावी. 


साई संस्थानाच्या प्रसादाबाबत असं बोलणं योग्य- नरहरी झिरवाळ  


साई संस्थानाच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा. अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला- मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही. असेही सुजय विखे म्हणालेत. यावर बोलतांना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,  भाविक श्रद्धा म्हणून प्रसाद त्या ठिकाणी घेतात, याचा अर्थ भिकारी होत नाही. जे दानशूर आहे तेही लाईनमध्ये उभे राहून प्रसाद घेतात. त्यामुळे असं बोलणं योग्य नसल्याचे ते म्हणाले.


हे ही वाचा