Ladki Bahin Yojana, मुंबई :  मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या हसत खेळत चर्चेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीच्या कृतीकडे लक्ष वेधलं आहे.  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगण्यात आलं आहे. यावर मुख्यमंत्र्यांदेखील हसत खेळत चर्चेत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विचारलं असता धनंजय मुंडे यांनी असं काही नसल्याचं सांगितलं आहे. बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावांचा उल्लेख आहे. तसेच फोटो आणि योजनेचे नाव देखील योग्यरीत्या वापरण्यात आल्याच मुंडे यांनी स्पष्ट केलं.  यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एक एसओपी आणूयात, असं म्हणाले. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.


मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मांडली भूमिका 


राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे नाव वगळलं गेल्याचं सांगत मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप नोंदवला. त्या संदर्भात काय वाद-विवाद झाला, अशा पद्धतीच्या काही बातम्या येत आहेत. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अजितदादांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा सुरु आहे. तो पक्षाचा कार्यक्रम आहे. तो आमच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुरु आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळ्यात आलं असेल तर त्यामध्ये आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही. 


दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संबंध महाराष्ट्रात बॅनर आणि होर्डिंग झळकले


ज्यादिवशी अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संबंध महाराष्ट्रात बॅनर आणि होर्डिंग झळकले होते. याचा अर्थ याची तयारी अगोदरच झाली होती. त्यावेळी आम्ही म्हणालो नाही की, या योजनेचं श्रेय मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं? असं नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी श्रेय घेतलं पाहिजे. अजितदादांनी श्रेय घेतलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनीही घेतलं पाहिजे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी या योजनेचं श्रेय घेतलं पाहिजे. कारण योजना चांगली आहे आणि लोकप्रिय आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील लोकांना आक्षेप घ्यावा, असं वाटण्याचं काही एक कारण नाही, असंही उमेश पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange Patil : मुस्लिम- मराठा आणि दलित एकत्र आला तर कार्यक्रम वाजला, मनोज जरांगेंनी स्ट्रॅटेजी सांगितली