सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी दिवाळीनंतरच फटाके फुटणार आहेत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटप आणि उमेदवारांची चाचपणी केली जात असून सर्वच विधानसभा मतदारसंघात हालचाली गतीमान झाल्या आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांनी, विद्यमान आमदारांनीदेखील प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात, सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महत्वाचा आणि लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या पंढरपूर-मंगळवेढामध्ये यंदा बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बा विठ्ठलची नगरी असल्याने पंढरपुरात आपल्याच पक्षाचा आमदार असावा, यासाठी राजकीय पक्ष मोठी ताकद लावतात. त्यामुळे, येथील निवडणुकीत यंदा चांगलीच चूरस पाहायला मिळेल. पंढरपुरात सध्या भाजपचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असून त्यांना महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.


महाराष्ट्राच्या कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आणि भीमेच्या तिरावर असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा (Pandhapur-mangalvedha) विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha) पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन तालुके येतात. मात्र, साखर कारखानदारांचा हा तालुका आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर येथे महत्वाचा ठरतो. दूध संघ, कारखानदारी, बाजार समिती अशा सहकार खात्याशी संबंधित वजनदार उमेदवार येथे सरस ठरू शकतो. त्यामुळे, ऊस उत्पादक शेतकरी, पंढरी नगरीचा विकास आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या मतदारसंघात महत्वाची ठरते. त्यातच यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांचाही फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे, त्यामुळे मतदारसंघात महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात टफ फाईट असताना देखील बहुरंग लढत निश्चित मानली जाते. 


महायुती व महाविकास आघाडीमध्ये टफ फाईट


राज्यात यंदा प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय सामना होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, जागावाटपात पंढरपूर विधानसभेची जागा कोणाला सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले. महायुतीचा विचार केल्यास येथे विद्यमान आमदार भाजपचे असल्यामुळे येथील जागा भाजपलाच मिळणार आहे. गत 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने येथे टफ फाईट दिली. त्यामुळे, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच सुटणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन पक्षात पंढरपूरसाठी लढत होईल. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून परिचारक कुटुंबाचा राजकीय दबदबा राहिला आहे. विशेष म्हणजे विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या विजयातही परिचारक यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे, भाजप महायुतीकडून यावेळी उमेदवार कोण? याची चर्चा रंगली आहे. त्यातच, प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे दोघांनीही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. मात्र, विद्यमान समाधान अवताडे यांना तिकीट देण्यास आल्यास प्रशांत परिचारक हे तुतारी हाती घेऊ शकतात. तर, महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके पुन्हा एकदा राष्ट्रवादीत म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवू शकतात. तर, साखर कारखानदार अभिजित पाटील यांचेही नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारखान्याचा प्रश्न मार्गी लावल्याने ते भाजपकडून लढतील अशीही चर्चा आहे. मात्र, तसं झाल्यास भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढयात काय झालं?


पंढरपूर मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात येतो. यावेळी, माढा लोकसभा निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. भाजपात असलेल्या मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे येथे लोकसभेला भाजप महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगला. त्यामध्ये, धैर्यशील मोहिते पाटील यांना विजय मिळाला. मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा 45,420 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील यांना 6,22,213 मतं मिळाली आहे. त्यामुळे, सध्यातरी येथे महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून येते.


2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?


पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विजय मिळवला होता. भारत भालके यांना 89,787 मतं मिळाली होती, त्यांनी भाजपा उमेदवार सुधाकर परिचारक यांचा 13,361 मतांनी पराभव केला होता. सुधाकर परिचारक यांना 76,126 मतं मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक पार पडली. त्यामध्ये, भाजपकडून समाधान अवताडे यांना तिकीट देण्यात आलं, त्यात अवताडेंचा विजय झाला. भाजपच्या समाधान अवताडे यांना 1,09,450 मतं मिळाली आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालकेंना तिकीट देण्यात आलं होतं. त्यामध्ये, भगीरथ भालके यांचा पराभव झाला, त्यांना 1,05,717 मतं मिळाली आहेत. येथील मतदारसंघात अवघ्या 2,955 मतांनी समाधान अवताडे विजयी झाले आहेत.


हेही वाचा


विधानसभेची खडाजंगी: सोलापुरात 11 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती