Kirit Somaiya On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत. त्यातील अनेक गुण मी घेतले आहेत. पवार साहेबांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे. सोमय्या पुण्यात खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


गिरीश बापटांची  प्रकृती मागील 20 दिवसांपासून ठीक नाही. श्वसनाचा त्रास होत असल्याने पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मागील दोन दिवसांपासून अनेक नेते येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दीनानाथ रुग्णलयात दाखल झाले होते. त्यांच्यात आणि किरीट सोमय्या यांच्यात फार कमी वेळ चर्चा झाली. त्यानंतर सोमय्यांनी शरद पवारांच्या वागणुकीचं आणि त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं.


किरीट सोमय्या म्हणाले की, "शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. प्रत्येक राजकारणी अनेक चांगली कामं करत असतो. शरद पवारांनी देखील अनेक चांगली कामं केली आहेत. पक्ष जरी वेगळा असला किंवा कट्टर विरोधक असले तरी शरद पवार हे गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं आहे. त्यांचा मानसन्मान सगळे करत असतात. ही महाराष्ट्राचीच नाही तर हिंदुस्थानाची संस्कृती आहे, असंही ते म्हणाले.


शरद पवार येणार म्हणून थांबलो


गिरीश बापटांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच किरीट सोमय्या गेले होते. त्यानंतर शरद पवार येणार आहेत असं कळल्यावर ते सगळी कामं बाजूला ठेवून रुग्णालयात थांबले. त्यावेळी गिरीश बापट यांच्या प्रकृतीची दोघांनी चौकशी केली. लवकर बरे व्हा आणि संसदेत या, असं शरद पवार यांनी गिरीश बापटांना म्हणाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 


देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनीही घेतली भेट


भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपचे अनेक प्रमुख नेते पुण्यात आले होते. मात्र त्यांच्या अंत्यदर्शनाला जाण्यापूर्वी भाजप नेते प्रवीण दरेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीश बापट यांच्या प्रकृतीही चौकशी करण्यासाठी दीनानाथ रुग्णालयात गेले होते. त्या नेत्यांनी प्रकृतीची चौकशी केली आणि लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली.