Nagpur Winter Session : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka Border Dispute)) विधानपरिषदेत (Vidhan Parishad) शिंदे सरकारवर (Shinde Fadnavis Government) हल्लाबोल केला. इथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा सुरु असताना, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज काय होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. आता दिल्लीत गेलाच आहात तर मग तिथे सीमाप्रश्न उपस्थित करणार का असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह आणल्याची माहिती दिली. या पेन ड्राईव्हमध्ये सीमाभागावरील एक डॉक्युमेंटरी असल्याचं ठाकरे म्हणाले. 


हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहातील कामकाजाला उपस्थिती लावली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 


उद्धव ठाकरेंनी पेन ड्राईव्ह काढला


दरम्यान, आपल्या निवेदनादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेनड्राईव्ह आणल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले, "विरोधीपक्षाने सीमावादाबाबत (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रस्ताव मांडला आहे. सभागृहातील सर्वांचं या विषयाबाबत एकमत आहे. जवळपास 56 वर्षापासून हा लढा सुरु आहे. ज्यावेळी भाषावार प्रांत रचना झाली त्या आधीपासून सीमाभागात मराठी भाषा रुजलेली आहे. कित्येक वर्ष तिथे राहणारे नागरिक मराठी भाषा बोलतात. हा लढा राजकीय नाही. एक पेन ड्राईव्ह मी देणार आहे. 1970च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केलेली आहे. अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा".


शिवसेनेत असताना लाठ्या खाल्ल्या, आता सीमा ओलांडली


हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. माणुसकीचा हा विषय आहे. इथ खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात, आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरंतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? इथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकारसारखी भूमिका मांडणार आहे का?


कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज बोलतात, आपले गप्प का?  


मी उगाचच या आंदोलनात होतो, त्या आंदोलनात होतो असं म्हणणार नाही. मी माझ्या आईसोबत त्यावेळी तिथे असताना शिवसेनाप्रमुखांना अटक झाली होती. त्यावेळी दहा दिवस मुंबई जळत होती. शिवसेना प्रमुखांनी आवाहन केल्यानंतर मुंबई शांत झाली होती. जनरल करीआप्पा यांना आम्ही उमेदवारी दिली होती. त्यावेळी आमचं हेच म्हणण होतं की आमची भूमिका भाषा विरोधी नाही. संजय राऊत चीनचे एजंट आहेत असं म्हणतात, कुठून यांनी शोध लावला. आपण नुसतं ऐकत आहोत कर्नाटक मात्र दररोज एक पाऊल पुढे जात आहेत. कर्नाटक मुख्यमंत्री जोरात दररोज बोलत आहेत आपले मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. एक शब्द अजूनही त्यांनी काढला नाही.


ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार का? 


बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.


सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्या, आजच ठराव मांडा


नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.