मुंबई: आतापर्यंत आपण अनेकांची भ्रष्टाचार बाहेर काढले, आपल्यामुळेच देशाला माहिती झालं की एखाद्या राजकारण्याने जर भ्रष्टाचार केला तर त्यालाही शिक्षा होऊ शकते, याचं समाधान आहे असं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं. राज्याच्या हितासाठी काही कॉम्प्रमाईज करावं लागतं असं सांगत आतापर्यंत ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यांच्या शेजारी आता बसावं लागतंय, हे फक्त देशाच्या आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सहन करतोय असं महत्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केलं. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात बोलताना किरीट सोमय्यांनी हे मत व्यक्त केलं.
'लार्जर इंटरेस्ट'साठी हा त्याग करतोय
ज्यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले त्यांना तुरुंगात न पाठवता सरकारमध्ये मोठी मंत्रिपदं दिली जातात, त्यावर काय वाटतं असा प्रश्न विचारल्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, आपण ज्यांच्यावर आरोप केले तेच आता आपल्या सोबत सत्तेत आहेत. याबद्दल मला सातत्याने विचारलं जातंय. मलाही रोज सकाळी उठल्यावर हाच प्रश्न पडतोय. ज्यांचा आरोप आपण बाहेर काढला त्या घोटाळेबाज आणि बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, त्याचं स्वागत माझ्या पक्षात होतंय हे योग्य आहे का असं रोज वाटतंय. पण देशाच्या आणि राज्याच्या 'लार्जर इंटरेस्ट'साठी मी हे सहन करतोय, हा त्याग करतोय.
आता काही कॉम्प्रमाईज करावं लागतंय, पण यापुढे असं होणार नाही असं सागंत किरीट सोमय्या म्हणाले की, मोठा भ्रष्टाचार संपवण्यासाठी हे करावं लागतंय. आताच्या सरकारमधील एका मंत्र्याने त्याच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यावर मी फाईल तयार करून पाठवली. त्यानंतर ते थांबलं.
उद्धव ठाकरेंचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला
अॅक्शन प्लॅन काय असतो ते सांगायतं नसतं असं म्हणत आपलं सगळीकडे लक्ष असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'चे आणि महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांचं कनेक्शन काय आहे हे मी शोधून काढलं. त्यामध्ये पैसे कुठून येतात, कुणाच्या खात्यात जातात, भ्रष्टाचार कसा होतो याचा हिशोब मी मांडला. त्यानंतर यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरू केला.
उद्धव ठाकरेंनी माफी मागितली तर मोदी त्यांना जवळ करतील
भावना गवळी असतील वा प्रताप सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे, ज्या भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या नाहीत त्या तक्रारी अजूनही मी मागे घेतल्या नाहीत असं किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जर प्रायश्चित केलं तर, यापुढे जर लुटमार आणि भ्रष्टाचार न करण्याचा संकल्प केला तर मोदीसाहेब त्यांना जवळ करतील असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.
सोमय्यांच्या बायकोने काय सांगितलं?
ज्यांच्यावर आरोप केले जातात त्यांना सोबत घेतलं जातंय, याचं काहीसं वाईट वाटतंय, पण राजकारणात हे करावं लागतंय असं किरीट सोमय्या म्हणाले. तसेच ज्यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, ते जरी सोबत आले, पक्षात आले तरी त्यांची बाजू कधीच घ्यायची नाही अशी सूचना आपल्या बायकोने दिली असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
राज्यात सिंचन घोटाळा झाला, पण तो सिद्धही झाला, पण त्यामधील राजकीय व्यक्ती मात्र सुटल्या असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्यांची तलवार म्यान
घोटाळे, भ्रष्टाचार याबद्दल नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या किरीट सोमय्यांनी विरोधकांच्या अनेक नेत्यांची अडचण केली होती. अनेक वेळा आधी सोमय्या ट्विट करायचे किंवा, माध्यमांसमोर बोलायचे आणि मग त्या नेत्याची चौकशी होत असे, त्याच्यावर कारवाई होत असे. आता गेल्या वर्षभरापासून म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आल्यापासून मात्र त्यांची कसरत होत असल्याचं बोललं जातंय.
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआच्या ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यापैकी अनेक नेते हे भाजपसोबत आता सत्तेत आहेत. त्यामुळे आरोपांच्या तलवारी चालवणाऱ्या सोमय्यांना आता ही तलवार म्यानात ठेवावी लागलीय अशी चर्चा आहे.
ही बातमी वाचा :