Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नाशिकमधून असून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर तोफ डागली. छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना केला आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेसाठी कुठलाच उमेदवार दिलेला नाही
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही. अपक्ष नाही आणि कोणताच नाही. आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. राजकारण आपला मार्ग नाही. राजकारणामध्ये मराठा समाजाचे आरक्षण (Maratha Reservation) मागे राहून राजकारण पुढे येईल. आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा आहे. स्वतः मोठं होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या. भुजबळ किती दिवस खोटं बोलणार आहेत. आमच्या 57 लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. तू विरोध करत राहा मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन दाखवणार, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे.
भुजबळांना कुठून पण पाठींबा येऊ द्या, मला काय करायचंय
छगन भुजबळ यांना नाशिकच्या उमेदवारीबाबत दिल्लीहून पाठींबा मिळाला, असे त्यांनी म्हटले होते. यावर मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, भुजबळ यांना अमेरिकेतून काय कुठून पण पाठिंबा येऊद्या. मला त्याचं काय करायचं. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करायचं आहे, असे त्यांनी म्हटले.
टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार
लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा.मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
आणखी वाचा
'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!