रत्नागिरी :  कोकणात (Kokan) सध्या मोठ्या राजकीय घडामोडी (Politics) घडत आहेत. रत्नागिरीमध्ये किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत (Uday Samant) यांचे बॅनर (Banner) हटवल्याची मोठी माहिती समोर येत आहे.  उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यामुळे कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.


किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले


किरण सामंतांच्या कार्यलयावरील उदय सामंताचा फोटो आणि बॅनर हटवण्याता आला आहे. किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर नेमके का हटवण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी किरण सामंत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


कोकणात राजकीय घडामोडींना वेग


किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. किरण सामंत यांचा याला दुजोरा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


नेमकं प्रकरण काय?


कोकणात उदय सामंत यांचे बॅनर आणि फोटो हटवले गेल्याची चर्चा जोरात सुरू झाली. रत्नागिरी शहरांमध्ये शिवसेनेच्या दोन कार्यालयावरून उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर हटवले गेलेले आहेत. त्यामुळे हे बॅनर का हटवले गेले? याची चर्चा सुरू झाली. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, माळ नाका आणि मारुती मंदिर ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालय आहेत. शहरातील जयस्तंभ या ठिकाणच्या कार्यालयामधून उदय सामंत यांचा कारभार हाकला जातो. तर उर्वरित दोन कार्यालयांमधून त्यांचे थोरले बंधू किरण सामंत कामकाज पाहतात. या दोन्ही ठिकाणी कामानिमित्त उदय सामंत यांचा येणं-जाणं देखील असतं. पण माळनाका आणि मारुती मंदिर या ठिकाणच्या कार्यालयावरून उदय सामंत यांचा फोटो आणि फोटो असलेले बॅनर हटवले गेले आहेत. त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावला गेला असून त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही. तर किरण सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. दरम्यान, उदय सामंत यांचे फोटो काढणे आणि फोटो असलेला बॅनर काढणे त्याचे सध्या राजकीय अर्थ काढले जात आहेत. उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर काढले गेल्यानंतर अगदी पुढच्या तासाभरामध्येच नवीन बॅनर लावला गेला. त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा जोरात सुरू आहे.


काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा


काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर ते महायुतीच्या प्रचारसभेत दिसल्याने वाद निवळल्याचं दिसून आलं होतं. मात्र, आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी मन की बात अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचं पाहायला मिळालं. यातूनच सध्या कोकणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे.


लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने किरण सामंत नाराज


किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांचे कार्यकर्तेही यामुळे नाराज होते. मात्र आपण पक्षासाठी काम करणार असं किरण सामंत यांनी सांगितलं होतं. पण, आता किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.


किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय?


काही दिवसांपूर्वीच किरण सामंत महायुतीचा प्रचार करताना दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. पण, आता अचानकपणे किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचा बॅनर हटवण्यात आला आहे. नेहमी गजबजलेलं असणाऱ्या किरण सामंत यांच्या कार्यालयातही आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजरीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ : उदय सामंतांचे बॅनर हटवले