Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला (BJP) 272 चा बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीनं (INDIA Alliance) दणदणीत विजय मिळवला आहे. एकट्या भाजपनं 240 जागा जिंकल्यात, तर एका जागेवरुन काँग्रेसची (Congress) शंभरी हुकली असून काँग्रेसनं 99 जागांवर यश मिळवलं आहे. अशातच एनडीए (NDA) 543 जागांच्या लोकसभेत बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिली असली, तरी एनडीएनं बहुमत मिळवल्यामुळे भाजपचा तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन होण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे. एनडीएचा बहुमताचा आकडा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षांमध्ये टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. 


भाजपनंतर सत्ताधारी एनडीएमध्ये टीडीपीनं सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू 'किंगमेकर' ठरणार आहेत. या निवडणुकीत टीडीपीनं 16 जागा जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमारांची जेडीयू आहे, त्यांना 12 जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे जागांचं समीकरण पाहिल्यास एनडीएचं सरकार स्थापनेसाठी भाजपला टीडीपी तसेच नितीशकुमार यांच्या जेडीयूवर अवलंबून राहावं लागेल. या राजकीय परिस्थितीत चंद्राबाबू नायडूंवर विश्वास ठेवता येईल का? कारण जर काहीसं मागे वळून पाहिलं तर पाठींब्यासाठी चंद्राबाबूंवर कितपत विश्वास ठेवावा? हा प्रश्नच आहे. याबाबतीत चंद्राबाबूंचा रेकॉर्ड तसा फारसा बरा नाही, याची साक्ष घडून गेलेल्या काही घटना देतात. 


'किंगमेकर' चंद्राबाबूंना इंडिया आघाडीकडून ऑफर


लोकसभा निवडणूक निकालांचा कल जसजसा स्पष्ट होत गेला, तसतशे चंद्राबाबू नायडू यांच्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या. एनडीएला जर सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांच्यासाठी चंद्राबाबूंची साथ अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पण, एनडीएच्या सत्तास्थापनेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्राबाबूंना इंडिया आघाडीकडूनही ऑफर देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. 


राजकीय वर्तुळातील चर्चा आणि माध्यमांमधील वृत्तांबाबत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. आम्ही एनडीएमध्ये असून एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जात असल्याचं जाहीर केलेलं.चंद्राबाबू नायडूं यांच्या घोषणेनं भाजपनं सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. दरम्यान, सत्य हे देखील आहे की, आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबत नायडू यांनी मार्च 2018 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (NDA) संबंध तोडले होते. पण त्यांच्या निर्णयाचा परिणाम 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिसून आला. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. 


2018 मध्ये NDAची साथ सोडली आणि 2024 मध्ये पुन्हा पाठींबा 


चंद्राबाबू नायडू बरोबर सहा वर्षांनंतर म्हणजे, मार्च 2024 मध्ये एनडीएमध्ये सामील झाले. आंध्र प्रदेशात भाजप आणि जनसेनासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली. युतीच्या अंतर्गत राज्यातील एकूण 175 विधानसभा जागांपैकी टीडीपीनं 144, जनसेनेनं 21 आणि भाजपनं 10 जागा लढवल्या. राज्यात भाजपसोबत युती असूनही नायडू यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेत मुस्लीम आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली. मुस्लिमांच्या चार टक्के आरक्षणाला आम्ही सुरुवातीपासून पाठिंबा देत आलो आहोत आणि यापुढेही राहणार असल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलेलं. 


पीएम मोदींचं कौतुक करत राहिले, पण...


एनडीएमध्ये परतल्यानंतर चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना दिसले. जिथे संधी मिळेल तिथे चंद्राबाबूंनी मोदींवर स्तुतीसमुनं उधळली. पण याच चंद्राबाबूंनी 2002 मध्ये गुजरात दंगलीनंतर नायडूंनी मोदींना विरोध केला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नायडू यांच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. ते सर्वाधिक काळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी 13 वर्ष 247 दिवस अनेक टर्म मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. याशिवाय, ते आंध्र प्रदेशचे एकमेव नेते आहेत, ज्यांनी आंध्रपासून वेगळे होऊन तेलंगणाची स्थापना केल्यानंतर राज्याची सूत्रं हाती घेतली.