बीड : स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा (Karuna Sharma) या बीड लोकसभेची निवडणूक (Beed Lok Sabha Election) लढवत असून त्यांना हिरा हे चिन्ह मिळालं आहे. करुणा शर्मा यांनी यापूर्वी कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवली होती, त्यानंतर आता त्या बीड लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. करुणा शर्मा या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी आहेत.


करुणा शर्मा या स्वराज्य शक्ती सेनेकडून ही निवडणूक लढवत असून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरांमध्ये त्यांनी प्रचार यात्रा काढून लोकांना मत देण्यासाठी आवाहन केलं. करुणा शर्मा या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये बीडमध्ये निवडणूक लढवत आहेत.


सोशल मीडियाच्या माध्यमातून मागच्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि आरोप करणाऱ्या करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. या निवडणुकीतसुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्या प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.


कोल्हापूरमध्ये फक्त 132 मतं


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत करूणा शर्मा यांनी भाग घेतला होता. त्यावेळी आपल्या विजयाचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना अवघी 132 मतं मिळाली होती. कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या.


धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांनंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बीड शहरात घर घेऊन, बीडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, आता बीडमध्ये घर घेतलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. बीडचे लोक माझ्यासोबत असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. तेव्हापासून त्या बीडमध्येच राहत आहेत. त्यानंतर करुणा शर्मा यांच्या कारवर हल्लाही झाला होता. 


धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?


करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी तीन वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली.


ही बातमी वाचा: