Bajrang Sonwane on Pankaja Munde, Beed Loksabha : "तुमच्या खासदाराला तुम्ही तुमच्या गावात पाहिलं का? लोकांना न भेटणाऱ्या या दबंग खासदार आहेत. मी परळी विधानसभा मतदारसंघात होतो. जबाबदारीने सांगतो. परळी विधानसभा मतदारसंघातील शिरसाळा भागात फिरत होतो. तेथील लोक सांगत होते, वैद्यनाथ साखर कारखान्याने आमचे पैसे बुडवले. ताईसाहेब लोकांना याची उत्तर द्या. हा पठ्ठ्या प्रत्येक गावात जात आहे. उजळ माथ्याने मी गावात फिरत आहे. तुम्ही म्हणतात की, आंदोलन करणारे लोक अडवतात. आंदोलन करणारे लोक तुम्हाला अडवत नाहीत, तर तुम्ही ज्यांना फसवलं ते लोक तुम्हाला अडवतात. तुम्ही त्यांना दोष देता, ही गोष्ट चुकीची आहे. अरे तुम्ही बहिण भाऊ दोघे एक झालात. निवडणुकीत करोडो पैसे खर्च करता, लोकांचे पैसे द्या", असे म्हणत खळबळजनक आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर केले आहेत. शिवाय, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही सोनवणे यांनी टीका केली आहे. बीडमधील प्रचारसभेत ते बोलत होते.  


बीडचे मागासलेपण का गेले नाही?


पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, वाहतूक ठेकेदार असो, ऊसवाले असो, कर्मचारी असो सर्वजण भेटतात. एक कर्मचारी म्हणाला आमचे 16 लाख ताईसाहेबांच्या कारखान्याने बुडवले. काहीजण म्हणतात हा पैसा बाहेरगावा गेला. विकासावर बोला, 15 वर्षात काय केलं सांगा? 10 वर्षात तुमचे सरकार होते. बीडचे मागासलेपण का गेले नाही? साधा घाटनांदूरला लोक थांबा मागतात तेवढं तरी देता येतय का बघा. मागच्या वेळी सर्व गोष्टी अलबेलं होतं. आता काय झालयं? यांच्या बोलण्याला कोणीही बळी पडणार नाही. माय-बाप जनता माझ्या पाठिशी आहे. 


हा तुमचा नाही तर बीड जिल्ह्याचा अपमान 


गोरगरिब मजुरांचा आमचा मुलगा बजरंग सोनवणे याला आम्हाला मतदान द्यायचं आहे, असं जनतेने ठरवलं आहे. पालकमंत्री महोदय हा तुमचा नाही तर बीड जिल्ह्याचा अपमान आहे. मोदींनी सभेत तुमचे नाव घेतलं नाही. मोदी म्हणाले मुस्लिमांना आरक्षण देणार नाही. तुम्ही मुस्लिम समाजाला तुम्ही दम देण्याचा प्रयत्न करत आहात. संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती असं कसं बोलू शकतो? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी केला. मोदी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचेही सोनवणे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


 Sangli Loksabha : सांगलीत 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण बाजी मारणार? माझा अंदाज