मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून वाल्मिक कराड हाच खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे सीआयडीने म्हटले आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरत असून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचे स्वत: मुंडेंनीच म्हटलं होतं. आता, वाल्मिक कराडचं नाव चार्जशीटमध्ये आल्यानंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. त्यातच, धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा (Karuna sharma) यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत धनंजय मुंडेंचा राजीनामा 2 दिवसांत घेतला जाईल असे म्हटले होते. आता, पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी राजीनाम्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा हे प्राधान्य आहे, त्यांचा राजीनामा लिहून घेतला असून दोन दिवस पुढे ढकलला आहे. दोन दिवसात आम्ही जाहीर करू अशी माहिती आहे. मात्र, मला हे आश्चर्य वाटतं आहे की राजीनामा लिहून घेतला आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


अजित पवार यांच्या पक्षात धनजय मुंडे यांचे मोठे पद आणि कर्तव्य आहे, म्हणून ते दबाव टाकत असतील, माझा राजीनामा घेतला तर मी पार्टी सोडेल असा इशारा देत असतील. पण, 100% मला विश्वास आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र एकाच मागणी करतोय की धनजय मुंडे यांचा राजीनामा. मी मंत्र्यांची बायको आहे पण मी राजीनामा मागत आहे. कारण, आज जर राजीनामा घेतला नाही तर यापुढे आणखी वाल्मिकसारखे लोक तयार होणार, असे देखील करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. 


तुरुंगात सर्व ती मदत होते


मी तुरुंगात असताना 100 % जेलमध्ये माझी उत्तम व्यवस्था व्हायची, माझ्याशी दररोज धनजय मुंडे फोनवर बोलायचे. मी 6 दिवस एक अॅपल खात होते, त्यानंतर मला 5 स्टारचे जेवण पाठविण्यात आले होते. पण, मी खाल्ले नाही. त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेवण पाठविले असेल, मोबाईल दिला असेल असे करुणा शर्मा यांनी म्हटले. 


धनंजय मुंडें राष्ट्रवादीत गेले अन् वाटोळं झालं


माझे पती भाजपसोबत होते तेव्हा चांगले होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले अन् वाटोळं झाले. धनजय मुंडे राष्ट्रवादीत गेले आणि वाटोळं झाले, त्यापक्षात नवाब मलिक हसन मुश्रीफ असे सगळे करप्ट लोक आहेत. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेल, शिंदे साहेबांपर्यंत बरं होतं, पण यांना का घ्यायला हवे, असा सवाल देखील करुणा शर्मा यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे छावा सिनेमा काढला जातो आणि दुसरीकडे असे अफजल खान वाढविले जात आहेत. मी सरकारला सगळे पुरावे देणार आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत मी उपोषणावर बसेल, अशी इशाराही करुणा शर्मा यांनी दिला आहे. 



हेही वाचा


इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार