पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्याकडे आलिशान रोल्स रॉईस कार कशी आली याचा सीआयडीने तपास सुरु केलाय . कारण ही रोल्स रॉयस हजारो कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या (Mahesh Motewar) मालकीची आहे . मोतेवारच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावावर ही गाडी आहे . मात्र, महेश मोतेवारला जेव्हा अटक झाली होती तेव्हा ही रोल्स रॉईस सीबीआयने (CBI) ब्लॉक केली होती. याचा अर्थ सीबीआयने ही गाडी विकायला बंदी घातली होती. मात्र, तरीही ती गाडी प्रशांत कोरटकर वापरात असल्याचं दिसून आले आहे . त्यामुळे राज्याच्या सीआयडीकडून ई मेल द्वारे या गाडीबद्दल माहिती विचारण्यात आली आहे . या रोल्स रॉईसची (Rolls royce car price) किंमत सात ते आठ कोटी इतकी असून कोरटकरकडे ती कशी आली याचा तपास आता सीआयडीने सुरु केला आहे. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरला गुन्हे दाखल असून कोल्हापूरच्या प्रकरणात त्याला अटकपूर्व जमीन मिळाला आहे.
देशभरातील साडेचार लाख गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचे अमिश दाखवून तब्बल चार हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मोतेवारवर आरोप आहे. डिसेंबर 2015 मधे महाराष्ट्र पोलीसांनी मोतेवारला अटक केली. त्यानंतर देशभरातील 22 वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोतेवारच्या विरोधात 28 गुन्हे नोंद झाले. त्यानंतर मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांचे लिलाव करण्यात आले. मोतेवारच्या जमीनी आणि वाहनांचा देखील लिलाव करण्यात आला. मात्र, मोतेवारकडे असलेली रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकर चालवत असल्याचे दिसून आले. ही रोल्स रॉईस मोतेवारच्या समृद्ध जीवन फुटडस इंडीया लीमीटेड या कंपनीच्याच नावे आहे. WB 02 AB0123 असा या गाडीचा नंबर आहे. रोल्स रॉइसच्या या घोस्ट मॉडेलची किंमत 7 ते 8 कोटी आहे. महेश मोतेवारच्या विरोधात पुढे सीबीआयने देखील कारवाई केली. महेश मोतेवार ओडीसा राज्यातील कटक कारागृहात आठ वर्षांहुन अधिक काळ कैद होता. काही दिवसांपूर्वी जामीन मिळवून तो बाहेर आला आहे.
तत्पूर्वी प्रशांत कोरटकर याने रविवारी रात्री एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हीडिओत प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाताना दिसत आहे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे कोरटकर या व्हीडिओ म्हणताना दिसत आहे. मात्र, प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे प्रशांत कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही.
तपास कोल्हापूर पोलिसांच्या हातात
प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपासही आता कोल्हापूर पोलीस करणार आहेत. नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रितसर कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
अमोल मिटकरींची टीका
प्रशांत कोरटकर ऐवजी एखादा मुस्लिम व्यक्ती बोलला असता तर अख्ख्या महाराष्ट्रात तथाकथित बांडगुळानी हैदोस घातला असता. आता मात्र सोयीने मुग गिळून गप्प आहेत. कोरटकरने केलेला ड्रामा महाराष्ट्राच्या लक्षात आलाय.शिवप्रेमी शांत आहेत याचा अर्थ केलेलं पाप धुतल्या गेलं असं होत नाही, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.
आणखी वाचा