ठाणे : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे, ते या निवडणुकीतही पाहायला मिळालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम मध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहेत. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेमध्ये 80 हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसतंय. 


आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचे वोटिंग कार्ड त्यांच्याजवल होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले. 


नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. हीच लोकशाही आहे का असा सवाल त्यांनी विचारला. मतदान करा असं आवाहन करता आणि मतदान यादीतून नाव काढता असा आरोप देखील यावेळी संतापलेल्या नागरिकांनी निवडणूक आयोगावर केला.


शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले की, "कल्याण भिवंडी लोकसभेत लाखो नागरिकांची नावे कमी केली आहे. जवळपास 1 लाख नावे मतदार यादीतून वगळली आहेत. मतदार राजा बोलत आहे आमचा मतदानाचा अधिकार हिराहून घेतला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी. काही दिवसांनी पुन्हा निवडणुका येणार आहेत. या यादीमध्ये डीलिटेड म्हणून शिक्के मारुन दिले आहेत. अनेक नावांमध्ये बदल झाले आहेत."


निवडणुकीवर मोठा परिणाम होणार


मतदार यादीमधून लाखो नागरिकांची नावे वगळली गेली असल्याने कल्याण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. तर भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो. 


मतदारयादीमधून नावे वगळण्यात असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे यावर बोलता येत नसल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. 


निवडणूक याद्या अपडेट होत असल्याने अडचणी


निवडणूक याद्या या फिल्टर केलेल्या आहेत. बरीच नावं दुबार होती. या याद्या अपग्रेड होत आहेत. या याद्या अपग्रेड होतात फोटो येत आहेत त्यामुळे काही नावं वगळली जात आहेत.त्यामुळे त्याचा कोणी गैर अर्थ घेऊ नये असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.


ही बातमी वाचा: