Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण : कल्याण लोकसभेत (Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेनेमध्ये (Shiv Sena) दोन गट झाल्यापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे निकटवर्तीय जेष्ठ नगरसेवक यांच्या विरोधात डोंबिवली (Dombivli) मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ हरदास (Bal Hardas) हे बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याची त्यांची ओळख आहे.
बाळ हरदास यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे. दोन दिवसांतून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा, कल्याण सोडून निघून जायचं, नाहीतर संपवून टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यानं मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. अरविंद पोटे यांना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ हरदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी बाळ हरदास यांनी पोटे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, खोटे आहेत, मी कुणालाही धमकी दिलेली नाही. धमकी देण्याचं त्यांचं काम आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात
कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून तिकीट देण्यात आलं आहे. डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. अशातच त्यांना पुन्हा एकदा महायुतीकडून निवडणूक रिंगण्यात उतरवण्यात आलं आहे. तसेच, श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत पाहायला मिळणार याबाबत काही शंका नाही. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे.