अहमदनगर: चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता जवळ आली असून जाहीर प्रचाराचे अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका लावण्यात आला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Lok Sabha) जवळपास सात सभा होणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भास्कर जाधव, भूषणसिंह होळकर यांच्या सभा होणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे ते रोहित पवार यांच्याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर कर्जत येथील सभेनंतर अजित पवार यांची मविआ उमेदवार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात दुपारी एक वाजता सभा होणार आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत गेल्यामुळे आज पारनेर येथे होणाऱ्या सभेत अजित पवार निलेश लंके यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवारांची सभा होताच निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सहा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या टीकेला उत्तर देऊ शकतात. तर दुसरीकडे सुजय विखेंच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची दुपारी एक वाजता सभा होणार असून सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मंगल गेट परिसरात सभा होणार आहे.
तर निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित सकाळी 9 वाजता शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे सभा होणार आहे तर सायंकाळी 6:30 वाजता जयंत पाटील, भास्कर जाधव , भूषणसिंह राजे होळकर यांच्या उपस्थितीत जामखेड येथे सभा होणार आहे. त्यामुळे आज अहमदनगर जिल्ह्यात सभांचा धडाका होणार असून शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे आणि इतर ठिकाणी निवडणुका झाल्यामुळे अनेक नेते आता नगर जिल्ह्यात येणार आहेत.
अहमदनगरमध्ये कोणत्या भागात सभा?
भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ एकूण चार सभा
अजित पवार - सकळी 9:30 वाजता कर्जत बाजार तळ
अजित पवार - सकाळी 11 वाजताची पारनेरचा बाजार तळ
पंकजा मुंडे- दुपारी 1 वाजता पाथर्डी बाजार तळ
केंद्रीय मंत्री रामदास आठवले - सायंकाळी 6 वाजता नगर शहरातील मंगल गेट
निलेश लंके यांच्या प्रचारार्थ एकूण तीन सभा
जयंत पाटील- सकाळी 9 वाजता शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव फाटा
जयंत पाटील, भास्कर जाधव, भुषणसिंह होळकर - सायंकाळी 6:30 वाजता जामखेड येथे सभा.
सुप्रिया सुळे- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे.
आणखी वाचा