कल्याण: अंबरनाथ मलंगड परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आज खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत , ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह सुलभा गायकवाड (Sulbha Gaikwad) दिसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली होती. कल्याणमध्ये (Kalyan Lok Sabha) स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटात असणारा वाद सर्वश्रुत आहेत. या घटनेमुळे कल्याण पूर्व येथील भाजपा शिवसेनेतील वाद शमला नसल्याच्या अनेक चर्चा देखील रंगू लागल्या होत्या .
याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी तिथे प्रचाराला गेले नव्हते , गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती त्या निमित्ताने तिकडे गेले होते. तिकडे असा काही प्रकार होईल, असे मला माहिती नव्हते. मी भाजपा सोबत आहे, आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. भाजपची जी भूमिका आहे त्यासोबत मी असेन, मी महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सुलभा गायकवाड यांनी सांगितले.
गावकीच्या कार्यक्रमाचे विनाकारण राजकारण केले; भाजपचा आरोप
भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे प्रकार करत असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होता आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या कार्यक्रमास गेल्या. स्वागत यात्रेतील जीपमध्ये सर्वात आधी गेल्या त्यानंतर खासदार संजय राऊत ,वैशाली दरेकर त्या जीपमध्ये आले. अशा पद्धतीने राजकारण करण्याची काही गरज नव्हती.
तो कार्यक्रम गावकीचा होता. धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. भाजप कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थक हे त्यांच्या भूमिकेसोबत आहेत. गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यादेखील भाजपासोबतच आहेत. त्यांचा महाविकास आघाडीला कोणताही पाठिंबा नाही. त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या सोबत आहेत, असे नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
आणखी वाचा
श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर, देशाचं लक्ष कल्याणकडे, हायव्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती?