मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात कोणता पक्ष किती जागा जिंकणार, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं ठरणार आहेत. विशेषत: शिवसेना पक्षातील फुटीनंतर राज्यातील मतदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एबीपी माझा-सी व्होटरने मतदानापूर्वी सर्वेक्षण करुन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपनियन पोलमध्ये ठाकरे गटाला राज्यात एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरेंचा बालेकिल्ला जागा असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. ( Maharashtra Loksabha Election 2024 Opinion Poll)
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाने आग्रहाने मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यापैकी चार जागांवर ठाकरे गट तर दोन जागा काँग्रेस पक्षाकडून लढवण्यात येणार आहेत. मात्र, एबीपी माझाच्या ओपिनयन पोलनुसार मुंबईतील सहापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. यापैकी केवळ दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. अन्यथा बाकी जागांवर महायुतीचे उमेदवार सहजपणे विजयी होऊ शकतात, असा निष्कर्ष एबीपीच्या ओपिनियन पोलमधून समोर आला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!
मुंबईतील उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा या मतदारसंघातून भाजपकडून पीयूष गोयल रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. परंतु, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे पारडे जड मानले जात होते. परंतु, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपच्या मिहीर कोटेचा यांना तगडी टक्कर देऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकालावेळी या एका जागेवरची परिस्थिती वेगळी असू शकते. मात्र, इतर सर्व ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो. ही सगळी परिस्थिती ठाकरे गटाच्यादृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
आणखी वाचा
महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!