मुंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) एका प्रकरणामुळं अडचणीत आले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील आणखी एक मंत्री यानिमित्तानं अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दैनिक सामनाच्या वृत्तानुसार जयकुमार गोरे 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेला त्रास दिला होता. व्हाटसअपवर त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.  आता जयकुमार गोरे यांचं हे जुनं प्रकरण समोर आल्यानं विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात येत  आहे. या प्रकरणी खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जयकुमार गोरे यांना बडतर्फ करण्यासाठी त्या पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.    


नेमकं प्रकरण काय?


दैनिक सामनाच्या वृत्तानुसार जयकुमार गोरे 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेला त्रास दिला होता. व्हाटसअपवर त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्यानंतर संबंधित महिलेनं सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल घेतली होती.  यानंतर जयकुमार गोरेंनी  सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जयकुमार गोरे यांना 10 दिवसांचा तुरुंगवास झाला होता.  नंतर ते प्रकरण मिटलं होतं. मात्र, संबंधित महिलेला पुन्हा त्रास सुरु झाल्यानं तिनं राज्यपालांना पत्र लिहिलं आहे.  या प्रकरणी जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.


जयकुमार गोरे कोण आहेत?


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सध्या माण खटावचे आमदार आहेत. माण खटाव मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झाले आहेत. सध्या ते भाजपचे आमदार आहेत. भाजपकडून ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे  भाजपमध्ये 2019 मध्ये आले होते.


2009 मध्ये पहिल्यांदा आमदार


जयकुमार गोरे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2009 ला पहिल्यांदा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जयकुमार गोरे 2014 ला काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले होते. मात्र, 2014 ते 2019 ची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


जयकुमार  गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तर, जयकुमार गोरे प्रथम काँग्रेस आणि आता भाजपमध्ये कार्यरत आहेत.


दरम्यान, जयकुमार गोरे यापूर्वी देखील अनेकदा वादात अडकल्याचं पाहायला मिळतं. मायणी येथील कोविड सेंटरमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं सातारा पोलिसांना निष्पक्ष चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश यापूर्वी दिले होते.  


मायणी तालुका खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्या प्रकरणी जयकुमार गोरे अडचणीत आले होते. गोरेंवर त्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार होती. त्या प्रकरणात जयकुमार गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं जयकुमार गोरेंना कोर्टात शरण येऊन त्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यासं सांगितलं होतं. वडूज कोर्टात ते हजर झाले होते. त्यानंतर अटकपूर्व जामीन  मिळाला होता. पोलिसांनी जयकुमार गोरेंच्या अटकेची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. 



इतर बातम्या : 


Jaykumar Gore: जयकुमार गोरेंकडून सरसेनापती हंबिरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार