Jaykumar Gore : कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये महिला आयपीएस अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील फोनमुळे राज्यभर मोठा वादंग निर्माण झाला होता. आज यावर माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी पालकमंत्र्यांना याबाबत सवाल केला होता. आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी या प्रकरणात मोठं वक्तव्य केलंय.
अवैध वाळू अथवा मुरूम माफीयांना सोडले जाणार नाही, हा माझा शब्द आजही कायम असून त्याचमुळे कुर्डू येथे मुरूम माफियांवर कारवाई झाली आणि गुन्हे दाखल झाल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. अशा अवैध माफियांच्या सोबत सरकारमधले कोणीही पाठीशी उभे राहणार नाहीत, असे ठामपणे सांगत यापुढेही अशा कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज वाळू व मुरूम माफी यांच्याबाबत कठोर भूमिका घेताना अप्रत्यक्षपणे सरकार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी असल्याचे संकेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
मुरूम माफियांवरील कारवाई सुरूच राहणार
मी आल्यापासून वाळू आणि मुरूम माफीयांचे धाबे कसे दणाणले हे सर्वांना माहीत असून विरोधक देखील मला याबाबत फोन करून कारवाई थोडी कमी करण्याची विनंती करतात. पुढच्या वेळी चुकी होणार नाही, यावेळी थोडी शिथिलता द्यावी, अशी विनंती विरोधक करत असतात. आम्ही मात्र जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याने वाळू व मुरूम माफियांवरील कारवाई सुरू राहणार असल्याचे देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते धैर्यशील मोहिते पाटील?
दरम्यान, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू या गावची परिस्थिती तर बीड पेक्षा भयानक असल्याचा आरोप केला होता. या गावात मुरूम माफीयांची मोठ्या प्रमाणात दहशत असून सरकारी जागेतील व मुंबई पुण्याला जगायला गेलेल्या गोरगरीब आणि दलित शेतकऱ्यांच्या शेतातील कोट्यावधी रुपयांचा मुरूम या माफीयांनी उचलला. शासनाने वरिष्ठ पातळीवरून या संपूर्ण गावाची तपासणी केल्यावर हे भयानक वास्तव समोर येणार असून गावातली ग्रामस्थ किती दहशतीत आहेत हेही दिसेल. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाळू आणि मुरूम माफीयांना सोडणार नसल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी कुर्डू प्रकरणातील माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.
आणखी वाचा