Solapur News : करमाळा पोलीस उपअधीक्षक (DYSP) अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) या बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या वेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून फोनवर धमकी मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यासाठी पाठिंबा उमटत होता. अशा परिस्थितीत जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे (Atul Khupse) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिला अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ करमाळ्यातील कमलाभवानी मंदिरासमोर त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.

मात्र, आता या आंदोलनामुळे अतुल खूपसे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 736 / 2025 असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

10 जणांवर गुन्हा दाखल

काल (शनिवार) करमाळ्यातील आई कमलाभवानी मंदिरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी DYSP अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण गांधीगिरी करत त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केला होता. यावेळी "लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही", अशा आशयाचे फलकही झळकवण्यात आले होते. मात्र आता अतुल खूपसे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण? 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारींनंतर DYSP अंजना कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. याच वेळी एका स्थानिक शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून, त्यांचं बोलणं DYSP कृष्णा यांच्याशी करून दिलं.

या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांचा आवाज ओळखला नसल्याने, "तुमची इतकी हिंमत की मला ओळखलं नाही?" अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे ऐकू येते. त्यावर अंजना कृष्णा यांनी, "तुम्ही माझ्या वैयक्तिक फोनवर कॉल करा" असे उत्तर दिले. यामुळे अजित पवार संतापले आणि "मी तुमच्यावर कारवाई करीन" असा इशारा दिल्याचेही व्हिडिओत दिसून येते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM

Babaraje Jagtap: अजितदादांना IPS अंजना कृष्णांशी फोनवर बोलायला लावणाऱ्या बाबाराजे जगतापांचा वादग्रस्त व्हिडीओ समोर; गंभीर गुन्ह्यांची नोंद अन्...